सांगोल्यात मतमोजणीची तयारी पूर्ण
सांगोला :
२५३-सांगोला विधानसभा मतदार संघातील मतमोजणी ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हाॅल) येथे आज शनिवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. सुरु होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मंगळवेढा विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी यांनी दिली.
सांगोला विधानसभा मतदार संघातील मतमोजणीकामी सुमारे १०० अधिकारी व कर्मचार्यांची टीम नियुक्त व कार्यरत केली असून सदर मतमोजणीसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ते आदेश दिलेले आहेत.मतमोजणीसाठी एकूण २३ फेऱ्या होणार असून त्यासाठी १४ टेबल ठेवण्यात आले असल्याचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे व सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांनी सांगितले.
मतमोजणी सुलभ होण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत.संपूर्ण मतमोजणीसाठी नियंत्रण अधिकारी,स्लिप मोजण्यासाठी अधिकारी, स्ट्रॉंग रुमसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संदीप भंडारे आणि इतर ९ कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत.सिलिंग टीमही नेमलेली असून भोजन व्यवस्था,हजेरी घेणे,स्क्रीन डिस्प्ले,व्हिडिओ चित्रीकरण,रिपोर्टिंगसाठी आणि मीडियासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला असल्याचेही सांगण्यात आले.
——————————————————————————