सांगोला नगरपालिकेने थकित भाड्यापोटी केले दुकानगाळे सील
सांगोला :
सांगोला नगरपरिषदेमार्फत मागील दोन महिन्यांपासून कर वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत थकबाकीदारांना भाडे व कराच्या रक्कमा भरणेबाबत नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत वारंवार सूचना देण्यात येत आहेत. परंतु तरीदेखील थकीत भाडे व कराच्या रक्कमा भरणा न केल्याने थकीत भाडे व कराच्या रकमेपोटी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषद मालकीचे एकूण ७ गाळे नुकतेच सील करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने विशेष वसुली मोहीम राबविण्याबाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून वारंवार आढावा व सूचना देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सांगोला नगरपरिषद मालकीचे ७ गाळे सील करण्यात आले.
सदरची कारवाई मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक स्वप्नील हाके, लेखापाल धनाजी साळुंखे,सतीश बनसोडे,अश्वजीत माने,अनिकेत चंदनशिवे,संजय गावडे,आनंद हुलजंतीकर,शरद चव्हाण,संतोष ठोकळे,योगेश रसाळ, संतोष जांगळे व रमेश मोरे आदींनी पार पाडली.
——————————————————————————
थकबाकी भरणा न केल्यास कारवाई अटळ :
थकबाकी भरणा करण्याबाबत नगरपरिषदेकडून वारंवार सूचना देवूनही थकबाकीदारांनी भरणा न केल्याने दुकानगाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली असून यापुढेही अशी कारवाई चालूच राहील.
थकबाकीदारांनी ही कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्याकडील थकबाकीचा भरणा त्वरित करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे. अन्यथा,वरीलप्रमाणे कारवाईस सामोरे जावे लागेल,याची सर्व थकबाकीदारांनी नोंद घ्यावी.
– मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी
——————————————————————————