इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध
इंदापूर/प्रतिनिधी :
इंदापूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या जीवघेण्या भ्याड हल्ल्याने राज्यातील प्रशासकिय यंत्रणेत चांगलीच खळबळ माजली असून या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत.तर,वाळूमाफीयांनी सुरु केलेल्या गुंडगिरीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे कार्यालयाकडे आपल्या सरकारी सुमो गाडीतून (एम एच ४२/ए एक्स/ १६६१) जात असताना इंदापूर तहसील कचेरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातील संविधान चौकात अज्ञात हल्लेखोरांनी गाडी अडवून तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या सरकारी वाहनावर लोखंडी रॉडने गाडीच्या काचा फोडून हल्ला केला.तसेच त्यांच्या व ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना पाहून आजूबाजूचे लोक धावून आल्याने तहसीलदार व चालक हे थोडक्यात बचावले. थेट तहसीलदारांवरच गंभीर हल्ला झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत,प्रशासकीय भवन येथील कर्मचारी व अधिकारी यांनी काम बंद करुन प्रशासकीय भवन येथे ठिय्या आंदोलन केले.तसेच विविध मान्यवरांनीही निषेध नोंदवला.
————————————————————
तहसीलदार हल्ला प्रकरणी आरोपींना अटक :
तहसीलदार श्रीकांत पाटील हे तहसील कार्यालय येथे त्यांचे ड्युटीवर शासकीय वाहनामधून वाहन चालक मल्हारी मखरे यांच्यासह जुना सोलापुर-पुणे हायवे रोडवरुन शंभर फुटी रोडकडे संविधान चौकातून जात असताना समर्थ टूल्स, इंदापुर येथे अचानक कांही इसमांनी पांढर्या रंगाची,विना नंबरची व काळया काचा असलेली स्काॅर्पीओ गाडी रोडला आडवी लावून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करुन त्यांचे हातातील लोखंडी रॉडने व लाल मिर्ची पावडर डोळयावर टाकुन वाहनाच्या सर्व काचा फोडुन जीवे ठार मारण्याचा कट रचल्याने इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर ४५४/२०२४ भा.दं.वि.कायदा कलम ३०७,३५३,३४१,४२७,५०४,५०६,१४३,१४४,१४७,१४८,१४९,१२०(ब) सह म.पो.का.क.१३५ प्रमाणे आरोपी नामे १) शिवाजी किसन एकाड (रा.बाब्रसमळा,इंदापुर) २) विकास नवनाथ देवकर (रा.सरडेवाडी ता. इंदापुर) ३) पिन्या उर्फ प्रदिप कल्याण बागल ४) तेजस अनिल विर ५) माऊली उर्फ शुभम महादेव भोसेकर (तिघे रा.भाटनिमगाव,ता. इंदापुर) व इतर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड आणि इंदापुर पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक एस.डी.कोकणे यांनी सपोनि डुणगे,सपोनि राऊत, सपोनि पवार,पोसई राळेभात,सहा. फौज.प्रकाश माने,पो.हवा.काशीनाथ नागराळे,लखन साळवे,विनोद रासकर,अमित यादव,सचिन बोराटे,पो.ना.विष्णु केमदारणे, सलमान खान,पो.शि.विशाल चौधर,गणेश ढेरे, सुहास शेळके,विनोद काळे,लक्ष्मण सुर्यवंशी यांची तात्काळ वेगवेगळी पथके नेमून सदर गुन्हयातील आरोपी १) पिन्या उर्फ प्रदिप कल्याण बागल २) तेजस अनिल विर ३) माऊली उर्फ शुभम महादेव भोसेकर (तिघे रा. भाटनिमगाव, ता.इंदापुर) यांना तात्काळ अटक केली.
सदर गुन्हयाचा तपास सर्वश्री डॉ. पंकज देशमुख (पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण),संजय जाधव (अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग),डॉ.सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती विभाग), एस.डी.कोकणे (पोलीस निरीक्षक, इंदापुर पोलीस ठाणे) यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.राजकुमार बुणगे हे करत आहेत.
———————————————————
राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळली – सुप्रिया सुळे
या घटनेचे वृत्त समजताच,राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली.शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत हल्लेखोरांची जर मजल जात असेल तर,राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती किती ढासळली आहे ? हे दिसून येते,अशा तीव्र शब्दात त्यांनी सदर घटनेचा निषेध केला.
———————————————————————
आ.रोहित पवारांनी केली गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी :
“गाडीखाली कुत्रं आलं तरी,विरोधक राजीनामा मागतील”,असे विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.दरम्यान,इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले असून या घटनेचा निषेध करत आ.पवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होता की,”गाडीखाली कुत्रं आलं तरी,विरोधक राजीनामा मागतील.” पण,गृहमंत्री महोदय, “गाडीखाली कुत्रंच नाही तर,जीवंत माणसं चिरडली जाताहेत. रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. इथेतर,भर दिवसा इंदापूर तहसीलदारांवरच हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाहीत, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही.कुठं आहे तुमचं कायद्याचं राज्य ?” फडणवीस यांच्यावर टीका करताना रोहित पवार पुढे म्हणतात की,”आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता.आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या.”
———————————————————————
तहसीलदारांवर हल्ला होणे,ही गंभीर बाब : – आ.दत्तामामा भरणे
माजी मंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांची विचारपूस करुन हल्लेखोरांवर ताबडतोब कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिकार्यांना दिल्या.यावेळी,आम.भरणे म्हणाले की,”तहसीलदार पाटील हे अतिशय प्रामाणिक अधिकारी असून त्यांच्यावर हल्ला होणे,ही गंभीर बाब आहे.”
———————————————————————
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही केला हल्ल्याचा तीव्र निषेध :
माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सदर हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला.अशा घटना इंदापूर तालुक्यात घडत नव्हत्या.ही फार गंभीर घटना आहे.त्यांनीही यावेळी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
———————————————————————
कायदेशीर मार्गाने आरोपींच्या विरोधात लढा देणार – तहसीलदार श्रीकांत पाटील
“मी नेहमीप्रमाणे इंदापूर प्रशासकीय भवनाकडे निघालो होतो.माझी गाडी संविधान चौकात आली तेंव्हा चारचाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी रॉडने त्याने थेट माझ्यावर हल्ला चढवला. आमच्या अंगावर मिरचीची पूड उधळली. त्यावेळी माझ्या गाडीत माझा चालक आणि मी होतो. आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, आणखी दोन ते तीन हल्लेखोर गाडीतून उतरुन आले. त्यांनीदेखील आमच्यावर हल्ला चढवला आणि ते फरार झाले”, अशी हकिकत तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितली.
याप्रकरणी आपण पोलिसात तक्रार दाखल केली असून आता आपण कायदेशीर मार्गाने अज्ञात आरोपींच्या विरोधात लढा देणार असल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले.
———————————————————————
प्रामाणिक अधिकार्याला साथ देणे ही सर्वांचीच नैतिक जबाबदारी :
सामान्यांच्या प्रश्नासाठी सामोपचाराने मार्ग काढणारा आणि चुकीचे कृत्य करणाऱ्यांना वठणीवर आणणारा तहसीलदार अशी तहसीलदार श्रीकांत पाटील यांची एक प्रतिमा असून त्यांनी वाळूमाफीयांसंदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका हेच या हल्ल्यामागचे प्रमुख कारण आहे. प्रामाणिकपणे कायद्याची अंमलबजावणी करणार्या अधिकार्याला साथ देवून व त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणे ही आपणा सर्वांचीच नैतिक जबाबदारी असल्याचे या निमीत्ताने सर्वच स्तरातून चर्चिले जात आहे.
———————————————————————————