सुनिल कांबळेंच्या हत्या प्रकरणातील गांवगुंडांवर कठोर कारवाई करावी – खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला :
आपल्या स्वार्थी व गुंड प्रवृत्तीची दहशत सर्वसामान्य व गोरगरीब लोकांवर कायमस्वरुपी निर्माण करण्याच्या उद्देशाने सांगोला तालुक्यातील महूदचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून महूद परिसरातील गावगुंडांची ही दहशत मोडून काढण्याकरिता पोलीसांनी सुनिल कांबळेंच्या हत्या प्रकरणातील गांवगुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी सूचना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली आहे.
महूद येथील सुनील कांबळे यांची गुरुवारी ११ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी महूद येथे आले होते. यावेळी,त्यांचे समवेत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.यासमयी,खा.मोहिते-पाटील यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती घेतल्यानंतर यावेळी बोलताना ते म्हणाले की,या ठिकाणी होत असलेली दहशत मोडून काढण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असून या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन होणे गरजेचे असल्याचे खा.मोहिते-पाटील यांनी सांगीतले.
याप्रसंगी बोलताना,शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की,या हत्या प्रकरणास जवळपास आठवडा होत आला आहे.मात्र या प्रकरणाचा योग्य तपास होत नाही. पोलिसांच्या तपासाबाबत येथील नागरिक समाधानी नाहीत.या तपासामध्ये कोणीतरी अडथळा निर्माण करत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.घटना घडल्यानंतर या तपासात असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे सी.डी.आर. तपासण्यात आले तर,तालुक्यातील नेमक्या कोणत्या नेत्याने पोलिसांना फोन करुन तपासात अडथळा निर्माण केला ? हे निष्पन्न होईल. शिवाय पोलिसांनी पकडलेल्या गुन्हेगारांचे फोन लोकेशन व फोन कॉल तपासले तर,या खूनाच्या सूत्रधारापर्यंत ताबडतोब पोहोचता येईल.मात्र,पोलीस याबाबत कोणतेही काम करत नसल्याने नागरिकांच्या मनातील संशय वाढत चालला आहे,असे ते म्हणाले.येथील कांबळे कुटुंबीयांना व ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांकडून न्याय मिळाला नाही,तर येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल,त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील.
यावेळी दामू साठे,अभिषेक कांबळे,कल्याण लुबाळ,अंकुश येडगे,दौलत कांबळे,जितेंद्र बाजारे, विजय कांबळे,वैभव कांबळे,शंकर पाटील,अशोक येडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————
मुलीच्या लग्नाची घेतली जबाबदारी :
सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांचे पश्चात मुलगा व मुलगी आहे.या गरीब कुटुंबातील मुलाच्या व मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी व खा.धैर्यशील मोहिते-पाटील घेत आहोत. तसेच मुलीच्या लग्नाची जबाबदारीही आम्ही घेत आहोत. – डॉ.बाबासाहेब देशमुख
———————————————
सूरजदादांकडून २५ हजारांची आर्थिक मदत :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक,अध्यक्ष व सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सूरजदादा बनसोडे यांच्याकडून सुनील कांबळे यांच्या कुटुंबीयांना रोख २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली .
——————————————————————————