सांगोला :
आजपर्यंत दुरंगी लढतीचाच सामना पाहिलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेला यंदा तिरंगी सामना पहायला मिळणार असून तिन्हीही तुल्यबळ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सांगोल्याच्या या तिरंगी लढतीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघात एकीकडे,दोनवेळा आमदार झालेले महायुती मधील मुख्यमंत्री शिंदे गटाचे उमेदवार शहाजीबापू पाटील, दुसरीकडे विधानपरिषदेवर निवडून गेलेले माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील तर, तिसरे जरी नवखे असले तरी,या मतदार संघातून तब्बल ११ वेळा निवडून गेलेले तत्कालीन आमदार स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ.बाबासाहेब देशमुख,असे तिघेही मातब्बर,तुल्यबळ व वजनदार उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या या लढाईत कोण जिंकणार ? आणि कोण हारणार ? किसमे कितना है दम ? हे पाहण्याची उत्कंठा सर्वपक्षीय नेतेमंडळी, पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार या सर्वांनाच लागून राहिली आहे.
आ.शहाजीबापूंनी केलयं काम भारी,आता जनतेची बारी :
२०१९ च्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवून शेकापच्या डाॅ.अनिकेत देशमुखांचा पराभव करत शहाजीबापू पाटलांनी बर्याच वर्षानंतर आमदारकी मिळवली खरी.पण,दोन-अडीच वर्षातच उध्दव ठाकरेंच्या विरोधात बंडखोरी करुन भाजपच्या सहकार्याने मुख्यमंत्रीपद पटकावलेल्या शिंदे गटात डेरेदाखल झालेल्या आमदार शहाजीबापूंचे “उखळ चांगलेच पांढरे झाल्याने” खोक्यांमुळे बदनामही तितकेच व्हावे लागले आणि “काय झाडी,काय डोंगार” मुळे प्रसिध्दीच्या झोतातही ते तेवढेच आले.
या सगळ्या राजकिय घडामोडीत, आ.शहाजीबापूंसह सांगोला तालुक्याच्याही सुदैवाने म्हणा,एक गोष्ट मात्र चांगली झाली की,कायम विरोधात बसण्याची पाळी आलेल्या सांगोल्याच्या आमदाराला मुख्यमंत्र्यांच्या पक्षातच असल्याने सत्ताधारी बाकावर बसण्याची यंदा संधी मिळाल्याने आ.शहाजीबापूंच्या आमदारकीचे चीज झाले.त्यातूनही “काय झाडी, काय डोंगार” मुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेले शहाजीबापू हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईतच बनल्याने मागील अडीच वर्षात सांगोला मतदार संघातील विकासकामांच्या मंजूरीचा व मंजूर कामांना लागणारा निधी खेचून आणण्याचा शहाजीबापूंनी जणू उच्चांकच केला,असे म्हणावे लागेल.सांगोला विधानसभा मतदार संघातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या विवीध योजनांसाठी व विकास कामांसाठी शहाजीबापूंनी तब्बल साडे पाच हजार कोटींचा निधी मंजूर करुन आणला.
एकंदरीत,आ.शहाजीबापूंनी “केलयं काम भारी,आता जनतेची बारी” म्हंटल्यासारखे जनता जनार्दन त्यांचेवर किती खुश आहे,हे येत्या २३ तारखेलाच कळेल.
—————————————————————————
आबांची बातच न्यारी,त्यांची कामाशी आहे यारी :
कांहीना कांही कारणास्तव दरवेळी माघार घेवून वैतागल्यामुळे,यंदाची विधानसभा निवडणूक कांहीही करुन लढवायचीच,अशी मनाशी खूणगाठ बांधलेल्या दीपकआबांना महायुतीमधून उमेदवारी मिळणे अशक्य असल्याचे दिसून येताच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला अखेरचा रामराम ठोकत ट्रॅक बदलून चक्क उध्दव ठाकरेंच्या भगव्या सेनेला जवळ केले आणि बघता-बघता उमेदवारीही मिळवली अन् त्यांच्या उमेदवारीमुळे यंदा सांगोल्यात पहिल्यांदाच तिरंगी लढत होत आहे,हे या निवडणुकीचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
शहाजीबापू पाटील यांचे स्पर्धक असलेल्या दीपकआबांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.परंतु, राज्य पातळीवरील राजकारणात सांगोल्यातील शेकापची खा.शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह आघाडी असल्याने आघाड्यांच्या राजकारणामुळे दीपकआबांना यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी कधीच मिळाली नाही.पण,राष्ट्रीय नेते खा.शरद पवार यांच्याशी असलेल्या जवळीकीचा त्यांना चांगलाच राजकिय फायदा मिळाला आणि सन २०१०-११ मध्ये त्यांना विधानपरिषदेची लाॅटरी लागली.
विधान परिषद सदस्य असताना दीपकआबांनी आपल्याकडे काम घेवून येणार्या व्यक्तीची पक्षपार्टी न बघता,प्रत्येकाच्या कामाला न्याय दिला.त्यामुळे,”आबांची बातच न्यारी,त्यांची कामाशी आहे यारी” असे म्हणत त्यांच्याकडे लोकांचा कल वाढू लागला व सद्य:स्थितीत त्यांना मानणाराही एक मोठा गट त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दिसून येते.पण, त्या गटाची नेमकी ताकद किती ? हे आजपर्यंत कुणालाच मोजता आली नाही.त्यांची ताकद किती ? हे नेहमी अंधारातच राहिले. यंदा,दीपकआबांनी थेट निवडणूकीच्या मैदानात उडी घेतल्याने सांगोल्याच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली असून आपण आजपर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर निवडून येवू,अशी त्यांना आशा आहे.
—————————————————————————
बाबासाहेबांजवळ आहे,आबासाहेबांच्या आशीर्वादाची शिदोरी :
सांगोला तालुका जसा दुष्काळी तालुका म्हणून प्रसिध्द आहे,तसाच तो शेकापचा बालेकिल्ला म्हणूनही प्रसिध्द आहे.शेकापचे जेष्ठ नेते व माजी मंत्री स्व.गणपतराव देशमुख उर्फ स्व.आबासाहेबांनी या तालुक्यावर सुमारे ५५-६० वर्षे आपलं अधिराज्य गाजवलं.दोन वेळचा अपवाद वगळता १९६२ ते २०१४ या कालावधीत ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून गेले.
स्व.गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते.परंतु, राज्यात या पक्षाची ताकद म्हणावी तेवढी नसल्याने ११ वेळा आमदार होवूनही एक-दोन वेळचा अपवाद वगळता त्यांना कायम विरोधी पक्षाच्या बाकावरच बसावे लागले आणि विरोधी पक्षाचे आमदार असल्याने सत्ताधारी पक्षाने त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी म्हणावी तेवढी मदत केली नाही आणि निधीही दिला नाही.त्यामुळे, स्व.गणपतराव देशमुख यांना तालुक्याच्या गरजा,अडीअडचणी व विवीध योजना पूर्ण करण्याकरिता लागणार्या निधीसाठी सतत मोर्चे, आंदोलने व संघर्ष करावा लागला. तरीही विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे,सांगोल्याच्या जनतेवर शासनाकडून कायम अन्यायच होत गेला म्हणून सांगोला तालुका हा दुर्लक्षितच राहिला.
स्थानिक पातळीवर सांगोला तालुक्यात मात्र,त्यांना मानणारा मोठा गट असला तरी,त्यांचे पश्चात, निर्माण झालेल्या नेतृत्वाची पोकळी भरुन काढण्याइतपत सक्षम नेतृत्व शेकापमध्ये नसल्याने मध्यंतरीच्या काळात शेकापमध्ये गटातटाचे राजकारण सुरु होवून पक्षात दुफळी निर्माण झाली होती.दरम्यानच्या काळात,स्व.गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी राजकारणात सक्रिय होवून शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला.डाॅ.बाबासाहेब देशमुख हे राजकारणात जरी सक्रिय झाले असले तरीदेखील,ते राजकारणात नवखे असल्यामुळे त्यांच्या कार्याची चुणूक त्यांना अद्याप दाखवता आली नाही.
सद्य:स्थितीत बाबासाहेबांजवळ आहे केवळ, आबासाहेबांच्या आशीर्वादाची शिदोरी आणि ही शिदोरी त्यांना कितपत साथ देणार ? हे येत्या २३ तारखेलाच कळेल.
—————————————————————————