अखेर शेकापच्या डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यात फडकावला लाल बावटा

सांगोला :

         सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत अखेर शेकापच्या नवख्या डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यावर पुन्हा लाल बावटा फडकावला.तसेच “काय झाडी,काय डोंगार” या डाॅयलाॅगमुळे उभ्या महाराष्ट्रात प्रसिध्द झालेले शिंदेसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील व उध्दवसेनेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील या दोन्ही दिग्गज नेत्यांना पराभूत करुन डाॅ.बाबासाहेब देशमुख हे “जायंट किलर” ठरले.

सांगोला विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील,महाविकास आघाडीकडून उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (माजी आमदार) दीपकआबा साळुंखे-पाटील तर,महाविकास आघाडी व इंडिया अलायन्सकडून शेतकरी कामगार पक्षाचे डाॅ.बाबासाहेब देशमुख हे तिन्हीही दिग्गज नेते आपले नशीब अजमाविण्यासाठी मैदानात शड्डू ठोकून उभे होते.सांगोल्याच्या आत्तापर्यंतच्या राजकिय इतिहासात पहिल्यांदाच अशापध्दतीने तीन वेगवेगळ्या पक्षाच्या तीन दिग्गज उमेदवारांमध्ये ही तिरंगी लढत होत असल्याने सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.

सुरुवातीला या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा धुरळा उडवत निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती.त्यामुळे,या तिघांपैकी कोण जिंकणार ? आणि कोण हारणार ? याचा अंदाज करणे,अवघड होवून बसले होते.परंतु,शेवटच्या ४-५ दिवसात उध्दवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील हे प्रचारात ढेपाळल्याचे चित्र दिसून आले व शिंदेसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांची पूर्वीची कट्टर कार्यकर्त्यांची फळी ही प्रचारयंत्रणेपासून दूरच राहिल्याचे जाणवू लागले तर दुसरीकडे,शेकापचे उमेदवार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी मात्र, निवडणुकीत नवखे असतानाही प्रचारयंत्रणेत चांगलीच आघाडी घेत महिला व युवक वर्गाचीही साथ मिळवली. त्यामुळे मतदानानंतर,शनिवारी पार पडलेल्या मतमोजणीवेळी शेकापचे उमेदवार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी एकूण १ लाख १६ हजार २५६ मते मिळवून तब्बल २५ हजार ३८६ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय प्राप्त केला.
——————————————————————————

दोघांचे भांडण अन् तिसर्‍याचा लाभ :

सांगोल्यात पूर्वीपासूनच शेकापचे स्व.गणपतराव देशमुख आणि पूर्वाश्रमीच्या काॅंग्रेसचे व आताच्या शिंदे सेनेचे शहाजीबापू पाटील यांच्यातच दुरंगी लढत होत होती.या दुरंगी लढतीत तालुक्यात प्राबल्य असलेल्या धनगर व मराठा समाजातील मतदारांचा आपापल्या समाजाच्या उमेदवाराला पाठींबा असायचा आणि विजयासाठी लागणारी मते ही मुस्लीम,दलित व ओबीसी समाजातील मतदारांमधून मिळवली जायची.यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत धनगर समाजाची एकगठ्ठा मते ही शेकापचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना मिळाली.परंतु दुसरीकडे, शिंदेसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील व उध्दवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील हे दोघेही मैदानात उतरल्याने मराठा समाजातील मतदारांमध्ये मात्र,विभागणी झाल्यामुळे या मतविभागणीचा लाभ तसेच दीपकआबांची उमेदवारी ही डाॅ.बाबासाहेबांच्या पथ्यावरच पडल्याने “दोघांचे भांडण अन् तिसर्‍याचा लाभ” या उक्तीप्रमाणे डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या गळ्यात विजयाची माळ पडल्याचे बोलले जात आहे.

सांगोला विधानसभा मतदार संघातील प्रमुख तीन उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :

* बाबासाहेब देशमुख – १,१६,२५६

* शहाजीबापू पाटील – ०,९०,८७०

* दीपकआबा साळुंखे-पाटील – ०,५०,९६२

* शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८६ मतांनी विजयी.
——————————————————————————

चोख पोलीस बंदोबस्तासह मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पडली पार :

सांगोला विधानसभा मतदार संघाची मतमोजणी ही शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी राजमाता पुण्यश्लोक (टाऊन हाॅल) अहिल्याबाई होळकर सभागृहात पार पडली. मतमोजणी कामी १४ टेबल ठेवण्यात आले होते. एका टेबलवर एक सुपरवायझर,एक मायक्रोऑब्झर्व्हर व एक मतमोजणी सहाय्यक अशा तीन कर्मचार्‍यांची टीम नेमण्यात आली होती.पोस्टल मतदानासाठी १० टेबल ठेवण्यात आले होते.त्यामध्ये एक सुपरवायझर,एक मायक्रो ऑब्झर्व्हर व दोन मतमोजणी सहाय्यक नेमण्यात आले होते.पोस्टल मतमोजणी करताना होम वोटिंग,सैनिक मतदान आणि निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांचे एकूण २६६६ मतदान झाले असून एकूण २ लाख,६३ हजार,६७९ मतदान झाले.

यामध्ये शेकापचे डाॅ.बाबासाहेब देशमुख यांना सर्वात जास्त म्हणजेच १ लाख,१६ हजार,२५६ इतके मतदान झालेले असून ते विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी यांनी घोषित केले.त्या खालोखाल, शिंदेसेनेचे शहाजीबापू पाटील यांना ९० हजार ८७० इतकी द्वितीय क्रमांकाची मते पडली.तर, शिवसेना (उबाठा) चे दीपकआबा साळुंखे-पाटील यांना तृतीय क्रमांकाची ५० हजार,९६२ मते मिळाली.

या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेमध्ये मतमोजणी निरीक्षक म्हणून अभिषेक गहलोत यांनी काम पाहिले.तर, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी भैराप्पा माळी,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संतोष कणसे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी डॉ.संदीप भंडारे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांचेसोबत सुमारे १०० अधिकारी व कर्मचारी मतमोजणी कामासाठी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराय खणदाळे, इन्स्पेक्टर ITBP जे.डी.मेहरसिंग यांचेवतीने मतमोजणी कक्षात चोख व कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.चोख पोलीस बंदोबस्तासह मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.                   – मिलिंद सावंत (मीडिया नोडल अधिकारी)