सोलापूर

आ.रोहित पवार हे अरणला सर्वात उंच वारकरी संप्रदायाचा ध्वज फडकविणार – शंकरराव लिंगे

 

सोलापूर :

        संत शिरोमणी सावता महाराजांचा महिमा अगाध असून संत शिरोमणी सावता महाराज यांची संजीवन समाधी अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे आहे. त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी अरण आहे.सावता महाराज हे कधीही पंढरपूरला गेले नाहीत. त्यांना आपल्या शेतामध्ये,पानांमध्ये,फुलांमध्ये,फळांमध्ये व भाजीमध्ये पांडुरंग दिसत होता. त्यांनी श्रमाला महत्त्व दिले आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. त्यांच्या या कार्याच्या स्मरणार्थ आमदार रोहित पवार यांनी वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा झेंडा अरणमध्ये फडकविण्याचा उपक्रम हाती घेतला असून आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा सर्वात उंच वारकरी ध्वज लोकार्पण सोहळा साजरा होत असल्याची माहिती अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी दिली.

यावेळी, बोलताना शंकरराव लिंगे पुढे म्हणाले की,आ.रोहित पवार यांनी सावता महाराजांच्या मुलीचे वंशज रमेश वसेकर यांना महाराष्ट्र भर फिरुन सावता महाराजांच्या कार्याचा महिमा सांगण्यासाठी व धार्मीक प्रसारासाठी एक चारचाकी वाहन दिले असून त्यांचे कौतुक करावे,तेवढे कमीच आहे. सावता महाराज यांच्या मंदिरामध्ये दरवर्षी एक पुजारी याप्रमाणे चार वर्ष वाटून चार पुजारी असतात,कारण हे चार मुख्य वंशज आहेत.त्यामुळे सदर ध्वजारोहन हे या मंदिराच्या जवळच व्हायला पाहिजे होते. त्यासाठी लागणारी जमीन हिस्सा देण्यासाठी आम्ही तयार होतो. माझ्या विहिरीतील जागेचा हिस्सा देण्यासही तयार असल्याचे अनेक वेळा रमेश पुजारी यांना आम्ही सांगितले होते.परंतु, रमेश पुजारी यांनी जाणूनबुजून त्यांच्या घराचे जवळ हा झेंडा बसवून फडकविलेला आहे.कारण, हा झेंडा
बघण्यासाठी सावता महाराजांच्या भक्तगणांना त्याठिकाणी, त्यांच्या घरीच जावे लागणार आणि त्यांना वंदन करताना दिली जाणारी देणगी व वर्गणी ही केवळ त्यांच्याच पदरात पडणार, हा त्यामागील त्यांचा उद्देश आहे.पण,त्यांच्या या हेतूमुळे सावता महाराजांचे इतर वंशज हे या मिळणार्‍या देणगीपासून वंचित राहणार,ही बाब खेदजनक आहे, अशी खंत शकरराव लिंगे यांनी यावेळी बोलून दाखविली.

ते पुढे म्हणाले की,रमेश पुजारी यांची आम्ही प्रथम माळी महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून निवड केली. त्यांना महाराष्ट्रभर फिरवले, लोकांच्या ओळखी करुन दिल्या.त्या ओळखीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे आशीर्वाद घेवून देणगी, वर्गणी, कपडे,भेटवस्तू अशा स्वरुपात लोकांची मदत मिळवली. परंतु, रमेश पुजारी हे या गोष्टीचा फायदा उचलून “खोबरं-तिकडे चांगभलं” या उक्तीप्रमाणे वागत आहेत.गेल्या कांही वर्षापूर्वी भाजपच्या व्यासपीठावर असणारे रमेश पुजारी हे आता वेगळ्या व्यासपीठावर विराजमान झाले आहेत. आ.रोहित पवार यांना याद्वारे एकच मागणी आहे की,त्यांनी एकाच महाराजांना गाडी दिलेली असून आता राहिलेल्या रविकांत महाराज,दादा महाराज व सावता महाराज या तिन्ही महाराजांनाही चारचाकी वाहन द्यावे.कारण, ४ पैकी राहिलेले ३ महाराजही आपल्यावर नाराज होवून कदाचित, दुसऱ्या पक्षांच्या नेतेमंडळींकडून गाड्या घेतील आणि मग हे ४ महाराज ४ दिशेने महाराष्ट्रभर,देशभर फिरतील आणि वेगवेगळ्या चार पक्षांचे विचार मांडतील,त्यामुळे, सावता महाराजांचा जो महिमा आहे, तो लोप पावेल. त्यामुळे,हे टाळण्यासाठी आपण राहिलेल्या या तिन्ही महाराजांनाही चांगल्या गाड्या द्याव्यात.तरच,सावता महाराजांचा विचार हा महाराष्ट्रभर आणि देशभर एकाच दिशेने आणि एकाच आवाजात सर्वत्र पोहोचेल,अशी विनवणी शंकरराव लिंगे यांनी आ.रोहीत पवार यांना केली आहे.

तसेच सावता महाराजांचे चरित्र व अभंग हे संशोधन करुन त्याचे शासनामार्फत प्रकाशन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आ.पवार यांचेकडून व्हावेत,अशीही मागणी श्री.लिंगे यांनी याद्वारे केली असून पवार कुटूंबियांचे राज्य सरकार व केंद्र शासनाकडे वजन आहे,त्यामुळे सावता महाराजांची कर्मभूमी असलेल्या अरणला “अ” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देवून तिथे वनौषधी संशोधन केंद्रही बनविल्यास सावता महाराज तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकासही साध्य होईल,असा विश्वास शंकरराव लिंगे यांनी व्यक्त केला.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button