राजकीय

शरद पवारांनी महाराष्ट्राचा एक दौरा केला तर, ते लगेच सत्तेवर येतात – खा.सुप्रिया सुळे

पुणे : शरद पवारांच्या एका दौऱ्याने महाराष्ट्रात सत्तांतर होते, हा इतिहास असून त्यांनी महाराष्ट्रात एक दौरा काढायाचा अवकाश की, ते लगेच सत्तेत येतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच केले आहे.

खा.सुप्रिया सुळे या इंदापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. निवडणुकीमध्ये पडझड होत असते, हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेलं नाही. शरद पवार यांचं राजकारण आणि समाजकारण जर पाहिले तर, ५५ वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत, तेवढेच उतारही आहेत. त्यांची ५५ वर्षात २७ वर्षे सत्तेमध्ये तर, २७ वर्षे विरोधात गेली आहेत. उलट ते विरोधक असतानाच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना जास्त प्रेम दिले आहे, असेही खा.सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, मी त्यांना (शरद पवार) नेहमी सांगते की, महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिले हे खरे असले तरी, विरोधी बाकांवर असतानाच उलट जनतेने तुम्हाला जास्त प्रेम दिले आणि हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. विरोधात आल्यानंतर शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघतात. त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते, ते माहिती नाही. पण तो दौरा पूर्ण झाला की, शरद पवार पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असे सुप्रिया सुळे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी राजकारणात महिलांना असलेल्या आरक्षणासंदर्भातही भाष्य केले. राज्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषदमध्ये महिला आल्या. तशाच लोकसभा आणि विधानसभेमध्ये देखील महिला यायला हव्यात. राष्ट्रवादी काँग्रेसची तर आरक्षणाची मागणी आहेच, पण मी आरक्षणातून लढणार नाही. मी सर्वसाधारण ओपन सीटमधून लढणार आहे. मी कुठल्या तोंडाने आरक्षण मागणार आहे ? मी शिकली सवरलेली असून ओपन सीटमधून निवडून आलेली आहे. त्याच्यामुळे मी आरक्षणामधून उमेदवारी मागणार नाही. पण कुठल्याही महिलेला गरज असेल तर, तिच्या पाठीमागे खंबीर उभी राहीन, अशी खात्रीही खा.सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button