महाराष्ट्र

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई :

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असून राज्यातील माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७ हजार ६४९ तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १२ नुसार ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करणेकरीता दि. ३१/०५/२०२२ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरायची असून आयोगाच्या दि. ०४/१०/२०२२ च्या सुधारीत अधिसूचनेने दि. ३१/०५/२०२२ हा दिनांक अधिसूचित करण्यात आला आहे.‌ या निवडणूकांसाठी संगणक प्रणालीव्दारे मुद्दा क्र.२ नुसार प्रभाग निहाय मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे मतदार याद्या तयार करण्यात याव्यात. त्यासाठी दि. १२/१०/२०२२ पर्यंत मतदार याद्या down load करुन त्यांचे printout काढून प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात याव्यात,असेही निर्देश देण्यात आले आहेत.

मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील

* मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक :
मंगळवार दि.३१/०५/२०२२
(१) प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक : बुधवार दि.१२/१०/२०२२
(२) हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी :
गुरुवार दि. १३/१०/२०२२
* गुरुवार दि.१३/१०/२०२२ ते मंगळवार दि.१८/१० /२०२२ पर्यंत (शनिवार दि.१५/१०/२०२२ रोजी) हरकती स्वीकारण्यात याव्यात.
* शुक्रवार दि.२१/१०/२०२२ :
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे.
* प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर त्या ग्रामपंचायतींच्या नांवासह (मराठी/इंग्रजी) प्रसिध्दी अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे तात्काळ न चुकता सादर करण्यात यावा.
* प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करताना पुढील बाबीची खात्री करुन घ्यावी : विधानसभा मतदार यादीत संबंधित ग्रामपंचायतींचा समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या,अधिक त्या ग्रामपंचायतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान आहे.

म्हणजेच संबंधित ग्रामपंचायतीतील विधानसभेच्या मतदार यादीत समाविष्ट असलेले सर्व मतदार त्या ग्रामपंचायतीच्या सर्व प्रभागांसाठीच्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेरील मतदार त्यामध्ये समाविष्ट झाले नाहीत,याची खात्री करावी. या मतदार यादीतील दुबार नावांबाबत दि.२४/०४/२००७ अन्वये कार्यवाही करावी. मयत अथवा स्थलांतरीत मतदारांच्या बाबतीत आयोगाच्या आदेशान्वये कार्यवाही करावी.
विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये बदल करण्याचे जसे की, नवीन नांवाचा समावेश करणे,नांव वगळणे, नांवातील दुरूस्ती व पत्त्यांमधील दुरुस्ती करणे, इत्यादीबाबतची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

* प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे. प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादीवर मतदार/नागरीकांकडून हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रारुप मतदार यादीला दि.१३-१०- २०२२ रोजी व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.
* प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करणे.
दि.१३/१०/२०२२ ते दि.१८/१०/२०२२ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून प्रभाग निहाय मतदार यादी अंतिम करण्यात यावी. प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर फक्त पुढीलप्रमाणे सुधारणा/दुरुस्ती करता येईल. लेखनिकांच्या कांही चुका दुसऱ्या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार. ६० संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नांवे असूनही ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नांवे वगळण्यात आली असल्यास, अशा मतदारांची नांवे ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ट करणे.

सदर मतदार यादी कार्यक्रमानुसार विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांवर वरीलप्रमाणे विचार करून त्यानुसार आवश्यक त्याच सुधारणा मतदार यादीत कराव्यात, जेणेकरून पुढील काळात याबाबत न्यायालयीन प्रकरणे उदभवणार नाहीत.
* प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे :
अंतिम मतदार याद्या अधिनियमातील तरतुदीनुसार अधिप्रमाणित करून त्याबाबतची सूचना दि.२१/१०/२२ रोजी मुद्दा क्र.८ मध्ये नमूद केलेल्या पध्दतीने प्रसिद्ध करण्यात यावी. मतदार यादी अंतिम करताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दी बाहेरील मतदारांची नावे अंतर्भुत करण्याबाबत आयोगाच्या दिनांक ०२/१२/२०२० च्या आदेशानुसार दक्षता घ्यावी. प्रारूप व अंतिम प्रभागनिहाय मतदार यादीस खालीलप्रमाणे व्यापक प्रसिध्दी द्यावी.जसे, ग्रामपंचायत तलाठी सजा, मंडळ अधिकारी, पंचायत समिती, तहसिल कार्यालयातील सूचना फलकावर तसेच स्थानिक वृत्तपत्रे स्थानिक केबल टि.व्ही.वरील सूचनांप्रमाणे आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे ग्रामपंचायत निवडणुकां संदर्भात विभाजन विहित मुदतीत व बिनचूक करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहील.

मतदार यादीचा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर एखादया ग्रामपंचायतीबाबत मा.न्यायालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास त्या ठिकाणचा मतदार यादी कार्यक्रम रद्द करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने आयोगास सादर करा.या मतदार यादी कार्यक्रमाच्या टप्यावर प्रत्यक्ष निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करावी व त्याचा अहवाल तत्परतेने आयोगास ई-मेलद्वारेच सादर करण्यात यावा. आपल्या कामाचा आढावा मा.आयुक्त यांचेकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी.

* राज्यातल्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक उपाययोजनाबाबत आयोगाने दि.१६/०५/२२ रोजी दिलेल्या आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच केंद्र व राज्य शासनाने कोवीड १९ च्या अनुषंगाने वेळोवेळी जाहीर केलेल्या विविध उपाययोजना व दक्षता घेण्याबाबत दिलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करावे. सदर प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने निर्धारीत केलेल्या कालावधीत पूर्ण होईल, याची दक्षता जिल्हाधिकारी यांनी घ्यावी,असा आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार पारित केला आहे.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button