नागपूर :
सामाजिक समता हा आपल्या परंपरेचा भाग होता. सर्व धर्मांच्या आचार्यांनी त्यांच्या शास्त्रांमध्ये विषमतेला, उच्च-नीच्चतेला व अस्पृश्यतेला विरोध असल्याचे जाहीर केले आहे. जातीभेदाचे समर्थन हे कधीही करता येणार नसून मधल्या काळात मनुष्याने मान खाली घालावी, अशा पद्धतीने आपण आपल्याच लोकांना वागविले,हेसुध्दा खरे आहे. या चुका आपण कबूल करायलाच हव्यात आणि चुका कबूल केल्याने आपले पूर्वज कांही निकृष्ट ठरत नाहीत. आपल्या शास्त्रांना जातीय विषमता मुळीच मान्य नाही. आपल्याकडे गुप्त सम्राटांच्या राजवटीपर्यंत आंतरजातीय विवाह चालायचे. कुणालाचा जातीभेद नको असल्याने ती भावना संविधानात देखील आली. परंतु, मधल्या काळात आपण केलेल्या चुकांचा व भेदांचा फायदा घेत इंग्रजांनी आपले शास्त्र व पूर्वज चुकीचे आहेत, असे सांगितले. त्याला प्रतिकार म्हणून आपणही अस्पृश्यता आणि वर्णभेद योग्य असल्याचे बोललो. त्यासाठी शास्त्राचे दाखलेसुद्धा देण्यात आले. तरीदेखील अशा प्रकारचे “जातीभेदाचे समर्थन मान्य करता येणार नाही. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांचे व पापाचे क्षालन करायलाच हवे”,असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शुक्रवारी व्यक्त केले..
विदर्भ संशोधन मंडळातर्फे ‘वज्रसूची-टंक’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नागपूर येथील सिव्हिल लाइन्समधील विदर्भ संशोधन मंडळाच्या डॉ.वा.वि.मिराशी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरसंघचालक बोलत होते. यासमयी, व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.मधुसूदन पेन्ना, लेखकद्वय डॉ.मदन कुलकर्णी आणि डॉ.रेणुका बोकारे, मंडळाचे कार्यवाह डॉ.राजेंद्र वाटाणे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर म्हणाले की, चंद्रपूरची भूमी ही केवळ कोळसा देणारी नसून तिने अनेक हिरे दिले आहेत. ती भूमी रत्नगर्भ आहे,असे गौरवोदगार माजी न्या.विकास सिरपूरकर यांनी काढले.याप्रसंगी, डॉ.मधुसूदन पेन्ना यांनी
‘आपल्या संस्कृतीतील अनेक पुरोगामी विचार योग्य पद्धतीने मांडले न गेल्यामुळे ते विचार पुढे अंधश्रद्धा म्हणून गणले गेल्याची’, खंत व्यक्त केली. लेखकद्वय डॉ.मदन कुलकर्णी आणि डॉ.रेणुका बोकारे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.राजेंद्र वाटाणे यांनी केले. शेवटी, तर आभारप्रदर्शन मंडळाचे कोषाध्यक्ष प्रणव हळदे यांनी केले.
—————————————————————————
More Stories
घरपट्टीत कसलीही दरवाढ नाही,ही तर वाढीव बांधकामामुळे करवाढ – नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने
दुष्काळी सांगोला तालुक्याला पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी त्वरित सोडावे – माजी आमदार दीपकआबा
स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीदिन व जयंती दिनानिमित्त सांगोल्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन