मुंबई :
विधानसभा निवडणूकीत भाजपाचे १०६ व आमचे (शिवसेनेचे) ५६-५७ आमदार निवडून आले आणि बहुमताच्या जोरावर भाजप-सेनेचे सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्यानंतर मात्र, ऐनवेळी भाजपची साथ सोडून उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करुन भाजपा व फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला,असा घणाघाती आरोप सांगोल्याचे लोकप्रतिनिधी व शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुंबई येथे आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना केला.
“मैद्याचं पोतं, दाऊदचा हस्तक आणि बारामतीच्या म्हमद्या” बरोबर आघाडी
बुधवारी विजयादशमी निमीत्त उध्दव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याला बीकेसी मैदानावरही दोन लाखाहून अधिक शिवसैनिकांची गर्दी होती.त्या बीकेसी मैदानावरुन बोलताना सांगोल्याच्या “गुवाहाटी फेम” आम.शहाजीबापूंनी उध्दव ठाकरे यांचेविरोधात ही तोफ डागली. एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले की, मी पूर्वी काँग्रेसमध्ये असताना, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्यावरील भाषण टीव्हीवर ऐकले असून त्यांनी आपल्या भाषणात नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधात तीव्र निषेध जाहीर केला आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांना कधी “मैद्याचं पोतं तर कधी दाऊदचा हस्तक” असे संबोधले आणि अजित पवार यांना तर ते “बारामतीचा म्हमद्या” असं म्हणत. एकंदरीत, स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या पक्षातील लोकांना जवळ थाराही दिला नाही,अशा स्वार्थी राजकारणी लोकांशी गळाभेट करुन आणि अडीच वर्षापूर्वी स्व. बाळासाहेबांच्या विचारांचे दोन तुकडे करुनच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचे आपले स्वप्न पुरे करुन घेतले, अशी जहरी टीकाही यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उध्दव ठाकरे यांचे विरोधात केली.
“मेलेल्या कुत्र्याला फरफटत न्यावे तसे,सर्व आमदारांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उकिरड्यावर फरफटत नेले”
अडीच-तीन वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी विरोधात भाजप व शिवसेनेची युती होती आणि या युतीच्या माध्यमातून भाजपाचे १०६ व शिवसेनेचे ५६-५७ आमदार निवडून आल्यानंतर आता भाजप-सेनेचेच सरकार येणार या आशेने आम्ही मुंबईला आलो. परंतु, इथे आल्यानंतर मात्र सगळे गणित बिघडलेले दिसले. भाजपला सोडून शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी असा महाविकास आघाडीचा अजंडा तयार झाला आणि आमच्या मताचा कुठलाही विचार न करता “मेलेल्या कुत्र्याला जसे फरफटत ओढत नेवून उकिरड्यावर टाकतात, तसे आम्हा सर्व शिवसेनेच्या आमदारांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उकिरड्यावर फरफटत नेवून टाकण्याचं पाप” उध्दव ठाकरे यांनी केले असल्याची जळजळीत टीकाही यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक