काय तो थाट, काय तो सोफा अन् काय ती व्हॅनिटी व्हॅन ? शिंदे गटाचा दसरा मेळावा एकदम ओक्केमध्येच
मुंबई :
शिवसेनेच्या उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या वाटचालीत पूर्वीपासूनच अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच या दसऱ्याला दोन मेळावे होत असून या दोन्ही मेळाव्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. कोणता मेळावा किती गर्दी खेचणार ? व कोणता मेळावा अधिक भव्यदिव्य होणार ? याकडे राज्याचं लक्ष लागलं असून त्यासाठी दोन्ही गटांनी या मेळाव्यासाठी ताकद लावली आहे.
विशेष म्हणजे,बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी एक व्हॅनिटी व्हॅन मागवण्यात आली असून, व्यासपीठाच्या मागेच ही व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये आरामदायी सोफा,विश्रांती घेण्यासाठी बेड असून बैठक घेण्यासाठी व्यवस्थाही आहे. तसेच ड्रेसिंग टेबलचीही सुविधा या व्हॅनमध्ये असून व्यासपीठावर येण्यापूर्वी ना.शिंदे या व्हॅनिटीमध्ये थांबणार आहेत. ही सर्व व्यवस्था पाहून “काय तो थाट, काय तो सोफा अन् काय ती व्हॅनिटी व्हॅन ? शिंदे गटाचा दसरा मेळावा, एकदम ओक्केमध्येच”असे म्हंटल्याशिवाय राहवत नाही,एवढे मात्र निश्चीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं दसरा मेळाव्याकरिता शिवाजी पार्क मैदान मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेले. पण,निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला. त्यानंतर शिंदे गटानं बीकेसी मैदानात दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली. शिंदे गटातील बहुतांश आमदार हे ग्रामीण भागातील असून या आमदारांवर त्यांच्या कार्यकर्त्यांना आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी १७०० एसटी बसेस बुक करण्यात आल्या आहेत. एसटी बसेससाठी शिंदे गटानं तब्बल १० कोटी रुपये रोख मोजले असून हा दसरा मेळावा भव्य आणि दिव्य करण्याचा त्यांचा मानस आहे.
बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ही व्हॅनिटी व्हॅन मागवण्यात आली असून व्यासपीठाच्या मागेच ही व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये आरामदायी सोफा, विश्रांती घेण्यासाठी बेड व बैठक घेण्यासाठी व्यवस्था आहे. ड्रेसिंग टेबलचीही सुविधा असून व्यासपीठावर येण्यापूर्वी ना.शिंदे हे या व्हॅनिटीमध्ये थांबणार,अशी माहिती आहे. तर दुसरीकडे, शिवाजी पार्क मैदानावरही दोन व्हॅनिटी पार्क करण्यात आल्या असून एक व्हॅनिटी व्हॅन ही ठाकरे कुटुंबासाठी आणण्यात आली आहे. तर, दुसऱ्या व्हॅनिटीत पक्षातील वरिष्ठ नेते थांबतील. या गटाच्या व्हॅनिटी व्हॅन्समध्येही सोफा,बेड व ड्रेसिंग टेबलची व्यवस्था आहे.आता या दोन्ही मेळाव्यापैकी कोणता मेळावा सरस ठरणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहीले आहे.
—————————————————————————