कार्यकारी अभियंता दीपक कोळींना,पालकमंत्र्यांनी पाठवले सक्तीच्या रजेवर
सोलापूर :”हर घर नल, जल से” या जलजीवन मिशनच्या कामाच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सर्वच आमदारांनी केल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना उद्यापासूनच (बुधवार दि.५ तारखेपासून) सक्तीच्या रजेवर पाठवल्याने अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर, झालेल्या टेंडर प्रक्रियेची चौकशी ही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग या तिन्हीं विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले असून येत्या १५ दिवसात चौकशी अहवाल देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.४ आक्टोबर रोजी झालेल्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील जलजीवन मिशन योजनेच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करत, एकाच मक्तेदाराला जास्त टेंडर दिले कसे ? त्या मक्तेदाराने बरीच कामे पेंडिंग ठेवली आहेत,असा प्रश्न उपस्थित करत, याची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी,आ.सुभाष देशमुख यांची बाजू आ.राम सातपुते व आ.यशवंत माने यांनी उचलून धरली. त्यामुळे,या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी समोर आल्याने पालकमंत्री विखे-पाटील यांनी दीपक कोळी यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी यावेळी, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर बसलेल्या आमदारांची ओरड वाढल्याने शेवटी या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग या तिन्हीं विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश त्यांनी दिले आणि या चौकशी समितीने येत्या पंधरा दिवसात अहवाल देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.तसेच कार्यकारी अभियंता कोळी यांना बुधवारपासून (उद्यापासूनच) सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेशही पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिल्यामुळे मंगळवारची जिल्हा नियोजन समितीची बैठक चांगलीच वादळी ठरल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
सदर बैठकीस जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सोलापूरचे खासदार स्वामी महाराज,खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, विवीध शासकिय विभागाचे सर्व अधिकारी, नियोजन समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.—————————————————————————