सांगोल्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व मिरज रोड बायपास रस्त्याच्या २२ कोटींच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
**********************************************
सांगोला :
आमदारकी मिळण्यापूर्वी,विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान,प्रत्येक स्टेजवर “एक संधी देऊन बघा, तालुक्यातील विकासाचे गणित आम्ही दोघे बदलून टाकू” असे एक अभिवचन मी व दिपकआबा सांगोला तालुक्यातील जनतेला देत होतो आणि त्या अभिवचनाची पूर्ती आम्ही दोघे मिळून करत असून सांगोला तालुक्यातील नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व महूद रोड जवळील वंदे मातरम चौक ते मिरज रेल्वे गेट काँक्रीट बायपास रस्त्याच्या एकूण २२ कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यामुळे सांगोला तालुक्यातील विकासाच्या पर्वाचे एक सोनेरी पान आज उघडत असून सुसज्ज अशा या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी लागणारा निधी कुठेही कमी पडू देणार नाही,असे अभिवचन आमदार शहाजीबापू पाटील यांनी भूमिपूजन प्रसंगी दिले.
सांगोला शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तसेच वंदे मातरम चौक ते मिरज रोड बायपास रस्त्याच्या २२ कोटींच्या कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी ११ सप्टेंबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी आमदार शहाजीबापू पाटील हे बोलत होते.
याप्रसंगी,ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड,शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे,शहराध्यक्ष तानाजी काका पाटील,उद्योजक महादेव गायकवाड,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे,नि.नायब तहसीलदार किशोर बडवे,शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे,युवा सेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे,माजी नगरसेवक संजय देशमुख व सोमेश यावलकर,आरपीआय तालुकाध्यक्ष खंडू सातपुते,सार्व.बांधकाम विभागाचे मुलगीर साहेब, ॲड.मुक्तार इनामदार,संतोष पाटील,समीर पाटील, इंजि.जयदीप दिघे,बाबासाहेब बनसोडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,पदाधिकारी,कॉन्ट्रॅक्टर व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आम.शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की,जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड व भाऊसाहेब रुपनर या ज्येष्ठ नेत्यांनी सातत्याने आम्हाला पाठबळ दिल्यामुळे आम्ही यशाकडे गेलो,आम्ही कोठे थांबलो नाही आणि लगेच कामाला लागलो. सांगोला शहराचा विचार केला तर, प्रत्येक इमारत ही इंग्रजांनी बांधलेली आहे.रेस्ट हाऊस इंग्रजांनी बांधले,तहसील कार्यालय इंग्रजांनी बांधले,प्रत्येक इमारत ही इंग्रज काळातील आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जी
आधुनिकता आणि आधुनिक तंत्रज्ञान कार्यालयाला मिळायला पाहिजे होते, ते मिळत नाही. सांगोला शहर व तालुक्यातील जनतेला त्रास होऊ नये या उद्देशाने आज एकच इमारत व त्या इमारतीमध्ये सर्वच शासकीय अधिकारी असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे ही एकाच इमारतीमधून होणार आहेत.या इमारतीमध्ये जनतेला बसण्यासाठी सुसज्ज असं वेटिंग हॉल तयार करण्यात येणार आहे. २०० नागरिक बसतील,अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिकच्या समृद्धी मार्गात जे हेवी बजेट आहे अगदी तसेच बजेट वंदे मातरम चौक ते मिरज रोड बायपास या रस्त्यासाठी घेतलेले आहे.आरटीओ रिझर्वेशनच्या इमारतीसाठी ५ ते ६ कोटी रुपयांचे कार्यालय लवकरच मंजूर करून घेणार असून वकिलांना बसण्यासाठी ही लवकरच एक सुसज्ज इमारत उभी करणार आहे. सगळ्या सुविधा एकाच कॅम्पस मध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच क्रीडा संकुलासाठी ६० कोटी रुपये मंजूर होतील. हा सगळा परिसर सुसज्ज करु,असे मत यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले. तसेच या इमारतीचे काम योग्य पद्धतीने व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, सांगोला तालुक्याच्या विकासामध्ये आणि विकासाच्या पर्वामध्ये नोंद व्हावी,असा हा दिवस असून तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय झाला आणि आज आपण या इमारतीचा व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करत आहोत. वेगवेगळ्या ऑफिसमध्ये हेलपाटे मारुन गेल्या ५० ते ६० वर्षांमध्ये तालुक्यातील जनता वैतागलेली आहे. एखादा अधिकारी ऑफिसमध्ये असतो,नसतो. परंतु या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व अधिकाऱ्यांवर वचक बसणार आहे व अधिकाऱ्यांना काळजीने या इमारतीमध्ये थांबावं लागणार आहे आणि इकडे तिकडे विस्कळीत असणारी कार्यालये एकाच इमारतीमध्ये येणार आहेत. हा एक फायदा तालुक्यातील गरीब व गरजू जनतेला होणार आहे.तसेच या ठिकाणी रस्त्याची फार मोठी अडचण होती,रेल्वेचे गेट पडल्यानंतर हजारो वाहने रस्त्याच्या बाजूने उभी केली जात होती. आता हा काँक्रीटचा रस्ता झाल्यावर तीही शहरातील आपली फार मोठी सोय होणार आहे. एक चांगले उद्योजक आणि ठेकेदार या कामासाठी आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे रस्त्याचे आणि प्रशासकीय इमारतीचे दर्जेदार काम होईल. सांगोला शहरांमध्ये व तालुक्यामध्ये विकासाचे वातावरण निर्माण झाले आहे.जनतेच्या लोकप्रतिनिधीकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा,प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न मी व बापू करणार आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत कोणाला काय बोलायचे आहे,ते बोलू द्या, परंतु सांगोला शहर व तालुक्यातील विकासाच्या बाबतीत बोलायचे शिल्लक ठेवणार नाही,असे मत यावेळी माजी आम.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.
—————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक