सांगोला :
केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेच्या सहकार्याने पथविक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज पुरवठा रुपाने देण्यात येत असून या अनुषंगाने सांगोला येथील बँक ऑफ महाराष्ट्र यांचेमार्फत शहरातील ८२ पथ विक्रेत्यांना रक्कम रु.१० हजारांचे खेळते भांडवल तसेच ३१ पथ विक्रेत्यांना रक्कम रु.२० हजारांचे खेळते भांडवल तर, ०४ पथ विक्रेत्यांना ५० हजार रुपयांचे खेळते भांडवल कर्ज पुरवठारुपाने उपलब्ध करून दिले आहे.सदर पथविक्रेत्यांनी डिजिटल पध्दतीने व्यवहार केल्यास त्यांना कॅशबॅक ऑफर आहे. कॅशबॅक ऑफरचा लाभ घेण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्र व नगरपरिषद,सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथविक्रेत्यांना “मैं भी डिजिटल” या मोहिमे अंतर्गत बुधवारी नगरपरिषद,सांगोला व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून Google pe, Phone Pe, BHIM, Paytm इ.अॅपच्या माध्यमातून कशाप्रकारे डिजिटल व्यवहार केला जातो ? याबाबत तसेच ‘penny drop transaction’ याचे प्रात्यक्षिक (प्रशिक्षण) देण्यात आले.
कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केल्याने पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावला.त्यातून त्यांना उभारी मिळण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत रक्कम रु.१० हजारांचे खेळते भांडवल कर्ज पुरवठा रुपाने बँकेकडून देण्यात येत असून यामध्ये शहरातील भाजी,फळे,तयार खाद्य पदार्थ,चहा,अंडी, भजीपाव,कापड,चप्पल, उत्पादित वस्तू तसेच रस्त्यावरील केशकर्तन,चर्मकार,पानपट्टीधारक इत्यादींना पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळते भागभांडवलाचा पतपुरवठा केला जात असून राष्ट्रीयीकृत बँकेच्या सहकार्याने ही योजना राबविली जात आहे.
सदर प्रशिक्षण देतेवेळी सांगोला नगपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विजयकुमार कन्हेरे व बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक दीपक गवळी यांचे हस्ते उपस्थित पथ विक्रेत्यांना QR कोडचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी, व्यवस्थापक दीपक गवळी यांनी पथविक्रेत्यांना डिजिटल पेमेंट व त्याचे फायदे या विषयी माहिती दिली.यावेळी नगरपरिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे, समुदाय संघटक बिराप्पा हाके व बँक ऑफ महाराष्ट्रचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
—————————————————————————
कॅशबॅक ऑफरचा लाभ घ्यावा :
पीएमस्वनिधी अंतर्गत लाभ घेणार्या पथविक्रेत्यांनी डिजिटल पेमेंटसाठी BHIM,PAYTM,GOOGLE PE, PHONE PE यासारख्या अॅपचा वापर करावा व या अॅपच्या माध्यमातून रक्कम रु.५० ते १०० पर्यंत कॅशबॅक ऑफरचा लाभ घ्यावा. – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने