भूमी अभिलेख विभागामार्फत सांगोला तालुक्यातील गळवेवाडी येथे सनद वाटपाचा कार्यक्रम संपन्न

 

सांगोला :

भारतीय प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून भूमी अभिलेख विभागामार्फत गुरुवारी २६ जानेवारी रोजी सांगोला तालुक्यातील गळवेवाडी येथील मिळकत धारकांना सनद वाटप करण्याचा कार्यक्रम सांगोला भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक रेश्मा तांबारे व गळवेवाडीचे ग्रामसेवक श्री.पठाण यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सांगोला तालुक्याच्या ग्रामीण भागातील विवीध गांवांच्या गावठाण ड्रोन सर्व्हेचे काम हे सर्व्हे आँफ इंडिया (भारत सरकार),भूमी अभिलेख विभाग (महाराष्ट्र राज्य) तसेच ग्रामविकास विभाग (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगतीपथावर असून तालुक्यातील ४७ गांवांचा ड्रोन फ्लाय पूर्ण होवून ४० गांवांचे चौकशी कामही पूर्ण झाले आहे. चौकशी कामाची पूर्तता होवून ४० पैकी १३ गांवांच्या सनदा प्राप्त झाल्या आहेत. ज्या गांवांमधील ड्रोन सर्व्हेचे चौकशी काम पूर्ण झाले आहे,त्या सांगोला तालुक्यातील सर्व गांवांमध्ये पुढील महिन्याभरात सनद वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उप अधीक्षक रेश्मा तांबारे यांनी यावेळी बोलताना दिली.

गुरुवारी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी गळवेवाडी (ता.सांगोला) येथील मिळकतधारकांना सनद वाटप करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे नियोजन भूमी अभिलेख विभागाचे शिरस्तेदार योगेश गोरे,परिरक्षण भूमापक नामदेव माळी,शिपाई गणेश सरडे आणि ग्रा.पं.चे शिपाई गोरख गळवे यांनी उत्कृष्टरित्या केल्यामुळे तसेच सनदेचे महत्व पटवून दिल्याने येथील मिळकतधारकांनी सनद फीचा भरणा करुन आपली सनद प्राप्त करुन घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
—————————————————————————
मालकीहक्काचा कायदेशीर पुरावा असलेली सनद प्राप्त करुन घ्या :

सनद हा एकदाच मिळणारा मालमत्तेचा अंतिम पुरावा असून सनद फी भरल्यानंतर मिळकत पत्रिका म्हणजेच सिटी सर्व्हेचा आँनलाईन उतारा उपलब्ध होणार आहे. सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी, गुणाप्पावाडी, बुरलेवाडी, हबीसेवाडी,वाकी (घेरडी), राजापूर,ढाळेवाडी, वाणीचिंचाळे,गळवेवाडी, कारंडेवाडी,देवकतेवाडी,खिलारवाडी व गायगव्हाण या १३ गांवच्या सनदा सद्य:स्थितीत प्राप्त झाल्या असून सनद हा मालकीहक्काचा कायदेशीर पुरावा आहे. तरी,या १३ गांवातील मिळकत धारकांनी सांगोला येथील भूमी अभिलेख कार्यालयात फी भरणा करुन आपली सनद प्राप्त करुन घ्यावी.
– उपअधीक्षक,रेश्मा तांबारे
—————————————————————————
       : सनदेचे फायदे :

* शासनाने नागरिकांना दिलेला हक्काचा पुरावा म्हणजे सनद.
* सनदेमध्ये धारकाचे नांव,क्षेत्र, नगरभूमापन क्रमांक आणि चतु:सीमेनुसार नकाशा दिलेला असतो.
* सनद हा मालकी हक्काचा पुरावा असल्याने कोणत्याही शासकिय कामकाजासाठी तो ग्राह्य धरला जातो.
* सनदेच्या आधारे धारकाला कर्जही उपलब्ध होईल.
* सनद धारकाला शासनाच्या विवीध आवास योजनेच्या मंजूरीकामी फायदा मिळेल.
* सनदेमुळे खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता येवून फसवणूक टळेल.
* सनद ही अहस्तांतरणीय असलेने धारकास शासनाकडून कायमस्वरुपी वंशपरंपरागत मालकी हक्काचा पुरावा मिळेल.
* सनद ही कायदेशीर असलेने न्यायालयीन कामकाजात पुरावा म्हणून वापरता येते.
* सनदेमुळे धारकांची पर्यायाने गांवाची पत सुधारेल.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^