सांगोला :
सांगोला येथील तालुका क्रीडा संकुलाची आम्ही स्वखर्चातून दरवर्षी स्वच्छता करुन क्रीडांगण स्वच्छ ठेवत असूनही सांगोल्याचे तालुका क्रीडा अधिकारी हे राजकीय दबावाखाली वारंवार त्रास देत असल्यामुळे आम्ही राजमाता क्रिकेट ॲकॅडमी ही क्रीडा संकुल येथून स्थलांतर करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती राजमाता प्रतिष्ठान व राजमाता क्रिकेट ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंदा माने यांनी नुकतीच दिली.
सांगोला शहरामध्ये सामाजिक व क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणार्या राजमाता प्रतिष्ठानचे काम पाहून तत्कालीन तहसिलदार यांनी क्रीडा संकुलाची स्वच्छता करण्याबाबत व क्रीडांगण वापरण्याबाबत सूचना केल्या असता,राजमाता प्रतिष्ठानने स्वखर्चातून जवळपास एक ते दीड लाख रुपये खर्च करुन तेथील सर्व चिलारीची काटेरी झाडे व गवत काढून त्याठिकाणी मुरुम व माती भरुन क्रीडांगण सपाट करुन घेतले होते. तसेच २१ जून योग दिनानिमित्त जवळपास ५० ते ६० हजार रुपयांची झाडे आणून त्याठिकाणी वृक्षारोपण करुन त्या झाडांना स्वखर्चातून टँकरने पाणी देवून झाडे जगवली.
तसेच संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी त्याठिकाणी स्वच्छता केली आहे. सन – २०१५ साली तालुका क्रीडा संकुल येथे राजमाता क्रिकेट ॲकॅडमीची स्थापना करण्यात आली. या ॲकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना माफक दरात फी आकारली जात होती, तर कांही गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जात होते. क्रिकेट ॲकॅडमीमध्ये मिळत असलेल्या योग्य प्रशिक्षणामुळे
ॲकॅडमीमधील मुले व मुलींची राज्य व जिल्हास्तरीय क्रिकेट संघामध्येही निवडी झाल्या.तसेच या क्रीडा संकुलामध्ये वेळोवेळी मोठया क्रिकेट स्पर्धाही भरविल्या. यासाठी तत्कालीन तहसिलदार व तत्कालीन तालुका क्रीडा अधिकारी यांचे चांगले सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.
परंतु,आताच्या परिस्थितीमध्ये क्रीडांगण सुसज्ज झाले असल्यामुळे ते आता कांही राजकीय लोकांना खुपत आहे. त्यामुळे राजकीय दबावापोटी तालुका क्रीडा अधिकारी यांच्याकडून पैशाची तसेच एका विद्यार्थ्यामागे दरमहा शंभर रुपये देण्याची मागणी होत आहे. हा आमच्यावर अन्याय असून प्रशासनाच्या याच त्रासाला कंटाळून राजमाता क्रिकेट ॲकॅडमी ही आता क्रीडा संकुलामधून इतरत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.राजमाता प्रतिष्ठान सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात चांगले काम करुन येणार्या काळात स्वत:चे चांगले क्रिकेट स्टेडीयम बांधणार असल्याची माहिती ॲकॅडमीचे संस्थापक,अध्यक्ष आनंदा माने यांनी यावेळी दिली.
तालुका क्रीडा संकुलामधील हायमास्ट दिवे सध्या बंद असून तेथे प्राथमिक सोयी-सुविधांचाही अभाव आहे आणि या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन क्रीडा अधिकारी मात्र,राजमाता सारख्या उत्तमप्रकारे काम करणार्या क्रीडा ॲकॅडमीला त्रास देण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवित आहे. वास्तविक पाहता, क्रीडा संकुलासाठी शासनाकडून येणार्या निधीचा सध्या भ्रष्टाचारी मार्गाने मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून यासंदर्भात, वरिष्ठांकडे पुराव्यानिशी लवकरच तक्रार करणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी आनंदा माने यांनी केले.
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने