नागपूर ते शिर्डी दीडशेच्या स्पीडने गाडी चालवत ५२९ कि.मी.चे अंतर, देवेंद्र फडणवीसांनी केले अवघ्या पाच तासात पार
शिर्डी :
राज्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन लवकरच होणार असून तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह एकाच गाडीतून या समृध्दी महामार्गावर टेस्ट राईड घेतली आणि समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. नागपूर ते शिर्डी दीडशेच्या स्पीडने गाडी चालवत सुमारे ५२९ कि.मी.चे अंतर देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या पाच तासात पार केले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बहुचर्चित समृद्धी महामार्गावर गाडीने प्रवास केला. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी जातीने महामार्गाची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच गाडीत होते. देवेंद्र फडणवीस हे स्वत: गाडी चालवत होते. अनेक दिवसांनी गाडी चालवूनही देवेंद्र फडणवीस यांनी वेगवान प्रवासासाठी उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरुन जवळपास १५० कि.मी. च्या वेगाने एखाद्या तरबेज चालकासारखी अगदी सुसाट गाडी चालवली. त्यामुळे त्यांनी नागपूर ते शिर्डी हे ५२९ कि.मी.चे अंतर अवघ्या पाच तासात पार केले. विशेष म्हणजे यादरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस कांही ठिकाणी सत्कारासाठी थांबले होते. नागपूरहून शिर्डीला टेस्ट ड्राईव्ह करताना त्यांचा ताफा वाशिममध्ये वारंगी कँपला जेवणासाठी थांबला होता. इतका रमतगमत प्रवास करूनही त्यांनी नागपूर ते शिर्डी हा पल्ला कमी वेळात पार केला. दुपारी साडेबाराच्या सुमारास शिंदे-फडणवीस गाडीने नागपुरहून निघाले होते.संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांचा ताफा शिर्डीत पोहोचला. यादरम्यान जालना येथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.गेल्या कांही दिवसांत ग्रामीण भागांमध्ये वीजबील न भरल्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. यावरुन जालन्यात संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले. शिंदे आणि फडणवीस आपल्याशी बोलतील, अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती. परंतु, हा ताफा शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता पुढे निघून गेला.
समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. फडणवीस सरकारच्या काळातच या महामार्गासाठी जमीन हस्तांतरण करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हे काम पुढे नेले. महाविकास आघाडीकडूनच या महामार्गाचं लोकार्पण केलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे फडणवीस यांना आपल्याच कार्यकाळात समृध्दी महामार्गाचे लोकार्पण करण्याची संधी नव्याने चालून आली. त्यानुसार येत्या ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले जाईल.
: समृध्दी महामार्गाची वैशिष्ट्ये :
विदर्भ, मराठवाड्यातील मागास भागांना राज्यातील उर्वरित परिसराशी जोडण्याच्यादृष्टीने समृद्धी महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या ११ डिसेंबरला या महामार्गाच्या ५२९ कि.मी.च्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे.या महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर इतकी असून यावर ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना,औरंगाबाद,नगर,नाशिक आणि ठाणे अशा १० जिल्ह्यांचा समावेश आहे. यातून २६ तालुके जोडण्यात येत असून, ३९२ गावांतून महामार्ग जाणार आहे. ७१० कि.मी. लांबीच्या महामार्गावर १७०० पूल असून यातील ४०० पुलांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
—————————————————————————