सोलापूर

विमानसेवेसाठी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही – सुशिलकुमार शिंदे

 

सोलापूर :

                                    सोलापूरातील विमानसेवेवरुन सध्या चांगलेच घमासान चालू असून होटगी रोडवरील विमानतळावरुन विमानसेवा सुरु करण्यास सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी आडवी येत असल्याने ही चिमणी तात्काळ पाडावी म्हणून उद्योजक आणि व्यापार्‍यांचा एक गट आंदोलन करत आहे तर, चिमणी पाडण्यास विरोध करणारा कारखाना बचाव समितीचा दुसरा गट तितकाच आक्रमक होत आहे. विमान सेवेवरुन चाललेल्या या वादात आत्तापर्यंत शांत बसलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही उडी घेतली असून “होटगी रस्त्यावरील विमानतळावरुन विमान सेवा सुरु करण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा मला तरी अडथळा वाटत नाही,” अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतीच दिली आहे.

सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी आणि विमानसेवा यावरुन सोलापूरात सध्या संघर्षाचे वादळ उठले आहे. कारखाना बचाव समिती आणि सोलापूर विकास मंच हे दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकले असून विमानसेवा वादात आता “होटगी रस्त्यावरील विमानतळावरुन विमान सेवा सुरु होण्यास सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही,’ असे सांगून प्रवासी विमानसेवा सुरु करण्याबाबत सध्या ज्यांची ताकद आहे, त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्लाही ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे.ते पुढे म्हणाले की, सध्या सुरु असलेला वाद हा निरर्थक असून मी अनेकवेळा विमानातून आलो आणि गेलो.पण तेंव्हा कधी हा प्रश्न आला नाही.आता अलीकडेच माझ्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी २८ विमाने लॅडिंग झाली होती. तेंव्हा कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता.आत्ताच हा प्रश्न का केला जातोयं ? हे समजत नाही. उलट ज्यांचं वजन आहे, अशा लोकांनी प्रवासी विमान सेवेबाबत संबंधित कंपन्यांकडे प्रयत्न केले पाहिजेत. “होटगी रोडवरील विमानतळावरुन विमान सेवा सुरु होण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही. आम्ही बऱ्याच वेळा त्याच विमानतळावर उतरतो, आजही उतरतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.बोरामणी विमानतळाबाबत मी माझ्या काळात प्रयत्न केले. पण, पुढे पाठपुरावा करणे गरजेचे होते, असे सांगून श्री.शिंदे म्हणाले की,बोरामणी विमानतळासाठी २०१० पासून भूसंपादनाचे काम सुरु झाले,जमीन ताब्यात आल्यानंतर विमानतळाच्या संरक्षक भिंतीचेही काम झाले.मी २०१४ पर्यंतच कार्यरत होतो, त्या नंतरचे मला कांही माहिती नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यानच्या काळात,विमानसेवेसाठी चक्री उपोषण करणारे सोलापूर विकास मंचचे शहा यांना साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी भर रस्त्यात पिस्तूल काढून धमकावले होते, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता सुशिलकुमार शिंदे यांनी या प्रकरणात वरीलप्रमाणे वक्तव्य करुन या वादातील तीव्रता कमी केल्याने या विमानसेवेवरुन उठलेले वादळ शमणार की, पुन्हा वेगळे वळण लागणार ? हे आता येणारा काळच ठरवेल.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button