सांगोला येथे लवकरच होणार जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय कार्यालय – आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख

सांगोला :

सांगोला तालुक्यातील जलसंपदा विभागाकडील एकूण प्रकल्प संख्या व सिंचन क्षेत्रांची गरज आणि येथील जलसंपदा विभागांशी संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे तसेच स्थानिक पातळीवर जलसंपदा प्रकल्पांचे प्रभावी व्यवस्थापन व्हावे,यासाठी सांगोला येथे जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्याची मागणी आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केलेली असून सांगोल्यात जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय कार्यालय लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

सध्या या क्षेत्रातील नागरिकांना व शेतकऱ्यांना प्रशासकीय कामांसाठी दूरवरच्या कार्यालयात जावे लागते,ज्यामुळे वेळ व खर्च वाढतो.त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय सांगोल्यात झाल्याने जलसंपदा प्रकल्पांचे स्थानिक पातळीवर नियोजन व अंमलबजावणी करणे तसेच सिंचन,पाणीपुरवठा यासंबंधी तक्रारींचे जलद निराकरण करणे तसेच स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना तांत्रिक व प्रशासकीय सहाय्य त्वरित उपलब्ध होणार आहे.सांगोला तालुक्यात २० को.प.बंधारे व १४ लघु पाटबंधारे तलाव आहेत. या प्रकल्पांची देखभाल,दुरुस्ती व सिंचन व्यवस्थापनाचे कामकाज करणे यामुळे सोयीचे होणार आहे.

त्या अनुषंगाने,आमदार डाॅ. बाबासाहेब देशमुख यांची सांगोला येथे जलसंपदा विभागाचे विभागीय कार्यालय होणे,या मागणीची जलसंपदा मंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्वरित दखल घेवून संबंधित विभागास सूचना देत सांगोला येथे लवकरात लवकर क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.मंत्री महोदयांनी तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिल्याने आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.
——————————————————————————