सांगोला एसटी आगारास जुलै अखेर २० एसटी बसेस देण्याचे परिवहन मंत्र्यांनी दिले आश्वासन – माजी आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला :

राज्याचे परिवहन मंत्री नाम.प्रताप सरनाईक यांच्याकडे सांगोला एसटी आगारास नवीन २० एसटी बसेस देण्यासंदर्भात व एसटी आवारातील विकास कामासाठी निधी देण्याबाबत समक्ष भेटून मागणीचे पत्र दिले असता,या मागणीचा तात्काळ विचार करुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगोला एसटी आगारास येत्या जुलै अखेरपर्यंत नवीन २० एसटी बसेस देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांनी दिली.

सांगोला एसटी आगारामध्ये सध्या ५२ एसटी बसेस असून त्यातील १० बसेस नजीकच्या काळात स्क्रॅपला जाणार असल्याने ४२ बसेसवरच आगाराचा कारभार चालविणे अशक्य होणार आहे.एकंदरीत या बसेस अपूर्ण पडत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवासी सेवेचा विचार करता ज्यादा बसेसची आवश्यकता व गरज भासत होती.ही गरज पाहून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे २० नवीन एसटी बसेस देण्यासंदर्भात पत्राद्वारे मागणी केली होती.

तसेच बस स्थानकाच्या आवारातील डांबरीकरण सद्य:स्थितीत खराब होवून खड्डे पडल्याने एसटी चालकांसह प्रवाशांनाही त्रास होत असून त्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशीही मागणी या पत्रात केल्यामुळे येत्या जुलै अखेरपर्यंत सांगोला एसटी आगारास नवीन २० एसटी बसेस देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री नाम.प्रताप सरनाईक यांनी ॲड.शहाजीबापू पाटील यांना दिले आहे.

सांगोला एसटी आगारास येत्या जुलै अखेरपर्यंत २० बसेस देण्याचे परिवहन मंत्री नाम.प्रताप सरनाईक यांनी कबूल केल्याने सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांची सोय होणार असून सांगोला एसटी आगाराचे उत्पन्न ही वाढणार असल्याचे माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
——————————————————————————

जनतेमधून व प्रवाशी वर्गातून आनंद :

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे प्रयत्नामुळे सांगोला एसटी आगाराची गेल्या अनेक वर्षाची मागणी पूर्ण होणार असून आगारास लवकरच २० नवीन बसेस मिळणार आणि एसटी आगार परिसरातील भागात नव्याने कॉंक्रिटीकरणही करण्यात येणार असल्याने सांगोला तालुक्यातील जनतेमधून व प्रवाशी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.