उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी होणार सांगोल्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण – माजी आम.शहाजीबापू पाटील

नाम.संजय शिरसाट यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
सांगोला :
राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व सामाजिक न्याय मंत्री नाम.संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला शहरातील विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण व लोकार्पण सोहळा गुरुवारी १० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार असून या लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
सांगोला शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व परिसराचे नुतनीकरण आणि सुशोभिकरण नुकतेच पूर्ण झाले असून या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण येत्या गुरुवारी १० एप्रिल रोजी दुपारी उपमुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडणार असून या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रध्देय डॉ.भिमराव यशवंत आंबेडकर, विधानसभेचे उपसभापती आण्णा दादू बनसोडे,पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई,सार्वजनिक कुटूंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर,ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे,खा.धैर्यशील मोहिते पाटील,खा.प्रणितीताई शिंदे,सांगोल्याचे आम. डॉ.बाबासाहेब देशमुख,माजी आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनाप्रित्यर्थ गुरुवारी १० तारखेला सांगोला महाविद्यालयात महाआरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून सदर शिबिरास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट देणार आहेत.त्यानंतर ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण व लोकार्पण करणार आहेत. लोकार्पण सोहळ्यानंतर नजिकच्याच विद्यामंदिर प्रशालेच्या पटांगणामध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला नाम.शिंदे हे संबोधित करणार असून यावेळी ते पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत,अशी माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेसाठी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ,शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष तानाजीबापू बनसोडे, माजी नगरसेवक किशोर बनसोडे,बाळासाहेब बनसोडे, बापूसाहेब ठोकळे,प्रा.संजय देशमुख सर,माजी नगरसेवक सतीश सावंत आदी उपस्थित होते.
——————————————————————
निधी मिळवून दिल्यामुळे मलाही आनंद होत आहे :
येत्या गुरुवारी सांगोल्यात सोनियाचा दिवस उगवणार असून आपल्या सर्वांच्या अभिमानाचा हा दिवस आहे. ज्यांनी मानवजातीला सुखकर जीवन जगण्याचा मार्ग दिला, सर्वांना समान न्याय हक्क दिला,संविधान दिले आणि ज्या संविधानामुळे आपण एकजूट आहोत,अशा विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सांगोल्यात उभा राहत असताना,एक मनस्वी आनंद होत असून यामध्ये जयंती उत्सव मंडळाचाही अभिमान वाटतो. कारण एवढा मोठा पुतळा कोणाकडेही न जाता उभा करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जातीपातीच्या पलिकडे आंबेडकरवादी असल्यामुळे मी या कामासाठी सर्वात मोठा निधी मिळवून देवू शकलो, त्यामुळे मलाही मनस्वी आनंद होत आहे. – माजी आमदार शहाजीबापू पाटील
#################
हे केवळ शहाजीबापू यांच्यामुळेच शक्य झाल्याने त्यांचे आभारी आहोत :
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सांगोल्यात पूर्णाकृती पुतळा उभा व्हावा यासाठी,सांगोल्याचे तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करुन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून २ कोटी रुपयांचा भरीव निधी दिल्यामुळे आज हा
पूर्णाकृती पुतळा मोठ्या डौलाने उभा राहीला असून या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते करण्याचा मानस जयंती उत्सव मंडळाचा होता. त्यामुळे सदर लोकार्पण सोहळा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून हे केवळ माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामुळेच शक्य झाल्याने त्यांचे आभारी आहोत.
– किशोर बनसोडे/बाळासाहेब बनसोडे/बापूसाहेब ठोकळे