“पहाट” उपक्रमांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हेगार वस्त्यांना भेट
सांगोला :
सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी व पोलीसांचा जनतेशी अधिकाधिक संपर्क वाढण्यासाठी ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी “पहाट” हा उपक्रम सुरु केला असून यामध्ये पोलीस अधिकारी हे गुन्हेगार वस्तीमध्ये जावून तेथील लोकांच्या अडीअडचणी सोडवत आहेत.तसेच तेथील लोकांना गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात घेवून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हेगार राहत असलेल्या वस्त्यांमध्ये जावून त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधण्याचा एक चांगला मंत्र दिला आहे.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिलेल्या सूचनेनुसार,सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी वर्ग सध्या सुरु असलेल्या दिवाळी सणाच्या निमीत्ताने आपापल्या पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार वस्त्यांवर जात आहेत आणि पोलीस अधिकारी वस्त्यांमधील लहान मुलांना फटाके व फराळ देवून त्यांच्याशी संपर्क करत आहेत.
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी महेश स्वामी यांनी मुगळी (ता.अक्कलकोट) येथे तर, वळसंग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांनी धोत्री व कुंभारी (ता.दक्षिण सोलापूर) येथे तसेच पांगरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी काटकर यांनी पांगरी येथे जावून तेथील लहान मुलांना फटाके वाटप केले. तसेच मागास कुटूंबांनाही दिवाळी फराळाचे वाटप केले.यामुळे, वस्त्यांमधील लोक पोलीसांशी आपुलकीने संवाद साधत आहेत. तसेच यापुढे गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास सहमती दर्शवत आहेत. त्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळूवन देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची उपलब्धी करुन देण्यासाठी पोलीस प्रशासन मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत.
पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या या सवांदामुळे मुलांच्या चेहऱ्यावर दिलासा व समाधान दिसून येत असून आगामी काळातील महत्वपूर्ण निवडणूक बंदोबस्तानंतर “पहाट” उपक्रमांसाठी अधिक वेळ देवून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
——————————————————————————