शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजचा ‘माजी विद्यार्थी मेळावा’ पुणे येथे उत्साहात संपन्न

सांगोला :

           सांगोला येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित,शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा कॉलेजचे माजी विद्यार्थी संघटना व शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दि.२६ आॅक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी दिली.

               या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अंकुशराव गायकवाड हे होते तर,प्रमुख पाहुणे म्हणून जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ,नऱ्हे कॅम्पसचे प्राचार्य डॉ.एम.एम.सरदेशमुख यांची उपस्थिती लाभली.२००९ साली सुरु झालेल्या शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमधून आत्तापर्यंत ३ हजाराहून अधिक विद्यार्थी पदविका अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडले असून आज ते देश-विदेशातील नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.अनेक विद्यार्थ्यांनी उद्योग-व्यवसाय सुरु करुन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले व कॉलेजचे नाव उज्वल केले आहे.

                       या मेळाव्याच्या माध्यमातून सन २०१२ पासून पास आऊट झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचा योग आला.विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेज जीवनातील जुन्या मित्र- मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. आपल्या कॉलेज जीवनातील अनेक आठवणी व क्षण यानिमित्ताने पुनर्जीवित करण्याची संधी त्यांना यामुळे प्राप्त झाली,अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

                           यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.एम.एम.सरदेशमुख म्हणाले की,शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजने आपल्या माजी विद्यार्थ्यांसाठी पुणे याठिकाणी मेळाव्याचे आयोजन करुन नोकरी व व्यवसाय या निमित्ताने बाहेर पडलेल्या व आपल्या कॉलेजमधील दूर गेलेल्या मित्र-मैत्रिणींना एकत्र येण्याची व कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देण्याची संधी निर्माण करुन दिली.

यावेळी प्रदीप मगर,संतोष लिगाडे,अमर माने,स्वागता भोरे,आशिष गुजर,मयुरी पवार,ओम वारे,माधवी शेंडे, सुधाकर पवार,सागर दौंड,नितीन लवटे,स्नेहल पाटील, अविनाश असबे,आकाश गुंजारी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देऊन पुन्हा एकदा त्यांनी शिवाजी पॉलिटेक्निकच्या प्रांगणात जाऊन आल्याची भावना व्यक्त केली. त्यांना आपल्या अनेक वर्ष दुरावलेला मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळाली, याबद्दल त्यांनी कॉलेजचे आभार मानले. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व संचालक मंडळ यांनी सांगोला सारख्या ग्रामीण भागात सुरु केलेल्या शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमुळेच आम्ही तंत्र शिक्षण घेऊ शकलो व जीवनात यशस्वी होऊ शकलो,अशी भावना व्यक्त केली.शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजमधील शिस्त,संस्कार त्याचबरोबर शैक्षणिक वातावरण यामुळेच आम्ही आयुष्यात यशस्वी झालो असल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.सर्व विद्यार्थ्यांनी आपले जुने वर्गमित्र व शिक्षक यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्रा.पी.सी.चव्हाण यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचा हेतू विशद करुन मेळाव्यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले.संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सदर माजी विद्यार्थी मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

             कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी प्रा.गणेश मिसाळ (अध्यक्ष), उद्योगपती इंजि.निलेश माने (उपाध्यक्ष),प्रा.आनंद गायकवाड (सचिव),प्रा.पृथ्वीराज लिगाडे (सदस्य),सर्व विभाग प्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस. डी.बावचे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.
—————————————————————————

माजी विद्यार्थ्यांनी गोर-गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी :

आज जे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत,ज्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून निधी उभा करुन तसेच त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन सध्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या गोर-गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी.
            – डॉ.आर.ए.देशमुख (प्राचार्य,शिवाजी पाॅलिटेक्निक)

——————————————

माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजशी असणारा ऋणानुबंध असाच जपावा :

विद्यार्थ्यांनी आपल्या गावी आल्यानंतर कॉलेजला भेट देऊन सध्या ज्ञानग्रहण करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजशी असणारा ऋणानुबंध असाच जपावा.
        – अंकुशराव गायकवाड (सचिव, शिवाजी पाॅलिटेक्निक)
——————————————