राजकीय

स्व.आबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले उर्वरित स्वप्न दुष्काळी पाणी परिषदेच्या माध्यमातून सत्यात उतरवणार – डॉ.बाबासाहेब देशमुख

 

सांगोला :

पिढ्यान पिढ्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी मिळावे,यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी या देशभक्तांने तसेच त्यांच्या जोडीला स्व.गणपतराव देशमुख यांनी ११ जुलै १९९३ रोजी पहिली पाणी परिषद घेतली. आजपर्यंत ३० पाणी परिषदा झाल्या असून सांगोला व आटपाडी तालुका केंद्रबिंदू मानून सांगली,सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी स्व.नागनाथ अण्णा नायकवडी व स्व.गणपतराव देशमुख यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून जनतेची एक मोठी चळवळ उभी केली. या चळवळीच्या माध्यमातून कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करायला भाग पाडले.गेल्या आठ वर्षांपूर्वी पार पडलेली २४ वी पाणी परिषद ही यशस्वी पाणी परिषद म्हणून त्या पाणी परिषदेची गणना केली गेली.  “दुष्काळात जन्माला आलो तरी, दुष्काळात मरणार नाही,शेवटच्या श्वासापर्यंंत जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची सेवा करीन” असे स्व.आबासाहेब नेहमीच म्हणायचे,स्व.आबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले हे उर्वरित स्वप्न या दुष्काळी पाणी परिषदेच्या माध्यमातून सत्यात उतरवणार असल्याचे प्रतिपादन शेकापचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मंगळवेढा येथे होणार्‍या ३१ व्या पाणी परिषदेच्या निमीत्ताने केले आहे.

डॉ.बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले की, दुष्काळी जनतेने पाण्यासाठी सलग ३० वर्षे दीर्घकाळ दिलेला व ऐतिहासिक स्वरूपाचा अभूतपूर्व असा लढा आहे. लोकशाही मार्गाने, अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने या चळवळीने सर्व टप्पे पूर्ण केलेले आहेत. त्यामध्ये १८ वर्षे वयोगटातील स्त्री-पुरुषांच्या सह्यांची निवेदने,गांव चावडी मोर्चा,तालुका तहसील कचेरी वरील मोर्चा,जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चे,पुणे येथील सिंचन भवनाला घेराव व ठिय्या आंदोलन,दादर-शिवाजी पार्क ते मंत्रालय मोर्चा व आझाद मैदानावरील ठिय्या आंदोलन व मानवी साखळी या सर्व मार्गाने जनतेमध्ये पाण्यासाठी जागृत करून राज्यकर्त्यांना टेंभू,ताकारी, म्हैसाळ व सांगोला शाखा प्रकल्पासह दुष्काळी भागाला पाणी देणाऱ्या सर्व योजनांच्या पूर्ततेसाठी आजपर्यंत पाणी परिषदेच्या माध्यमातून भाग पाडले. टेंभू,म्हैसाळ,ताकारी इत्यादी प्रकल्पाचे पाणी तलाव व नदीत आले आहे.  चळवळीच्या पायाभूत घोषणेनुसार प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहोचणे आवश्यक आहे.त्यासाठी मुख्य कालव्यास कालव्याचा दर्जा देणे,पोट कालव्याची कामे पूर्ण करणे, तसेच कार्यक्षेत्रातील तलाव, पाझर तलाव,गांव तलाव व कोल्हापूर पद्धतीचे पाटबंधारे भरून देणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. पाणी परिषदेच्या माध्यमातून आपल्या हक्काचं उर्वरित राहिलेल्या क्षेत्रात व शेतकऱ्याच्या शिवारामध्ये हे पाणी पोहोचले पाहिजे,यासाठी पाणी परिषदा यशस्वी झाल्या. आजपर्यंत केंद्र व राज्य सरकारने नववर्षाच्या काळामध्ये सांगोला शाखा प्रकल्प, टेंभू,म्हैसाळ व ताकारी प्रकल्पासह राज्यातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पापैकी जवळजवळ २६ अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. ते केवळ पाणी परिषदेचेच यश म्हणावे लागले.महाराष्ट्रासह सबंध देशभर दुष्काळ,कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती यासारख्या संकटांना घाबरून इथला शेतकरी आत्महत्या करत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये ४९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणे,हे स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षातील राजकर्त्यांच्या शेती व पाणी विषयाच्या चुकीच्या धोरणामुळे उदभवलेली समस्या आहे,असे सांगीतले.

दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मूलन व उच्चाटन करण्यासाठी आपण पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी व स्व.आमदार भाई डॉ.गणपतराव देशमुख यांनी दाखवून दिलेला मार्ग आहे,असे सांगून ते पुढे म्हणाले की,त्या मार्गाने पुढे जाऊन उर्वरित समान पाणी वाटपाच्या सर्व कामांच्या पूर्ततेसाठी भरीव निधीची तरतूद राज्यकर्त्यांना करायला भाग पाडण्यासाठी व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त व कर्जमाफी देऊन त्यांचे उतारे कोरे करण्यासाठी तसेच शेतीला हमीभाव व दुधाला आधारभूत खर्चावर आधारित दर मिळवण्यासाठी व शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी मंगळवेढा येथे ३१ वी पाणी परिषद होत आहे. देशभक्त क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी व स्व.आमदार गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी घालून दिलेली तत्त्वे,आदर्श, सामान्य जनतेप्रती असणारा आदर, लोकशाही मूल्याची जोपासना,जन चळवळ तसेच चळवळीच्या माध्यमातून शेतकरी,कामगार आणि कष्टकरी जनतेला सोबत घेऊन दुष्काळग्रस्त तालुक्यातील राहिलेले उर्वरित अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तरी,सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यातील मायबाप जनता व बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन शेकापचे युवा नेते डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
————————————————

       : पाणी परिषदेतील मागण्या :

१) टेंभू,म्हैसाळ,सांगोले शाखा, उरमेडी,निरा,देवधर इ.योजनांना केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान कृषी सिंचन विकास योजनेत’ समावेश करून ताबडतोब निधी उपलब्ध करावा.
२) टेंभू,म्हैसाळ,सांगोले शाखा,ऊरमोडी,तारळी, ताकारी,धोम, बलकवडी,नीरा-देवधर इत्यादी योजनांचे पाणी समन्यायी वापराच्या तत्त्वावर आटपाडी, सांगोला,जत, मंगळवेढा,कवठेमंकाळ,तासगाव, कडेगाव,खानापूर,मिरज पूर्व,पलूस,खटाव,खंडाळा, माण इ.दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळावे.
३) वरील योजनांच्या मुख्य कालव्यासाठी व पोटकालव्यासाठी तसेच दि. २ मे २०१७ रोजी शासनाने जाहीर केलेल्या नवीन धोरणाप्रमाणे मुख्य कालव्यावर ठिकठिकाणी १०० हेक्टरच्या व त्यावरील सिंचनासाठी नवीन जलसाठे,लहान तलाव,पाझर तलाव,गाव तलाव,कोल्हापूर पद्धतीचे पाटबंधारे,सध्या अस्तित्वात असलेले व नवीन साठे निर्माण करून नळाद्वारे त्यामध्ये पाणी साठवण्यासाठी निधीची व्यवस्था व तरतूद करणे.
४) महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरणाने पाण्याचे दर छोट्या शेतकऱ्यांना परवडण्या एवढेच ठेवावेत आणि समान पाणी वाटपाची अंमलबजावणी करावी.
५) चितळे जल आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीवर राबून जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे १००० घनमीटर पाणी सिंचनासाठी उपलब्ध करण्याचे तत्व सर्व योजनांना लावून सरकारचे समन्यायी पाणीवाटप प्रत्यक्षात अंमल करून देशाच्या सरासरी सिंचन टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावा.
६) भीमा,माण व कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ताबडतोब भरून देण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी, उजनी उजवा कालवा व जत, सांगोला,मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळच्या ६ व्या टप्प्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी व निधीची व्यवस्था करण्यासाठी ३१ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button