दुधाच्या दरवाढीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकर्‍यांची नाराजी सत्ताधार्‍यांसाठी धोक्याची ठरेल – शेकाप नेते डाॅ.बाबासाहेब देशमुख

 

सांगोला :

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शेतीतून होणारा तोटा भरुन काढण्यासाठी दुभती जनावरे पाळून दूधाच्या पूरक व्यवसायावर आपला प्रपंच कसाबसा सांभाळणार्‍या शेतकर्‍याचा दुग्ध व्यवसायही सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संकटात सापडला असून शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे,दुधाच्या दरवाढीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास शेतकर्‍यांची नाराजी ही सत्ताधार्‍यांसाठी धोक्याची ठरेल,असा गंभीर इशारा शेकाप नेते डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या “रास्ता रोको” आंदोलना दरम्यान बोलताना दिला.

दूध दरवाढीच्या मागणीसाठी सांगोला येथील पंचायत समिती समोरील मिरज-पंढरपूर हायवेवर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने युवा नेते डाॅ.बाबासाहेब देशमुख यांचे नेतृत्वाखाली नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी, दूध दरवाढीच्या मागणीचे निवेदन तहसीलदार संजय खडतरे यांनी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत स्विकारले. यासमयी, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे,युवा नेते दत्ता टापरे, माजी उपसभापती नंदकुमार शिंदे,तुषार इंगळे आदींनी आपले विचार व्यक्त केले.

                        याप्रसंगी,खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव,शेकापचे चिटणीस दादासाहेब बाबर,उद्योगपती बाळासाहेब एरंडे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन समाधान पाटील,माजी चेअरमन गिरीश गंगथडे,सूतगिरणीचे व्हा.चेअरमन अँड.नितीन गव्हाणे,संचालक अवधूत कुमठेकर,माजी नगरसेवक सुरेश आप्पा माळी,चंद्रकांत सरतापे,वैभव केदार,विष्णू देशमुख,दीपक गोडसे यांच्यासह शेकापचे जेष्ठ पदाधिकारी,कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
—————————————————————————