राजकीय

सांगोल्यात शेकापकडील आमदारकी भविष्यातही पुन्हा ५० वर्षे कोणी काढून घेऊ शकणार नाही – भाई जयंत पाटील

नुसत्या डरकाळ्या फोडू नका,मैदानात या आणि कुस्ती धरा – डाॅ.बाबासाहेब देशमुख

सांगोला :

                     सांगोला तालुक्यातील कष्टकरी, गरीब शेतकरी व घाम गाळणारा माणूस जोपर्यंत,लालबावट्या बरोबर आहे. तोपर्यंत,या सांगोल्यावरचा लालबावटा कोणीही काढू शकणार नाही.बाईसाहेबांच्या आयुष्यातील आज सर्वात मोठा क्षण आहे.दोन्ही नातवांमधील जे कांही मतभेद होते,ते बाजूला सारुन आज त्यांच्या हयातीत दोन्ही नातू एकत्रित आल्यामुळे आता सांगोल्यात शेकापकडील आमदारकी भविष्यातही पुन्हा ५० वर्षे कोणी काढून घेऊ शकणार नाही,असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,शेतकरी कामगार पक्षाने बुधवारी आयोजित केलेल्या भव्य मेळाव्याप्रसंगी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर,रतनबाई गणपतराव देशमुख,शोभाताई पाटील,  डॉ.बाबासाहेब देशमुख,डॉ.अनिकेत देशमुख,डॉ.निकिता देशमुख,माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर,उद्योगपती बाळासाहेब एरंडे,चिटणीस दादाशेठ बाबर,माजी चिटणीस प्रा.विठ्ठलराव शिंदे सर,खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजी.रमेश जाधव,सूतगिरणीचे चेअरमन डाॅ.प्रभाकर माळी यांच्यासह शेकाप व पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाई जयंत पाटील पुढे म्हणाले की,सांगोला तालुक्याच्या दृष्टीने आजचा हा ऐतिहासिक क्षण असून स्वतःचे आयुष्य जनतेसाठी अर्पण करणारा व्यक्ती डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या रुपाने आज आपण जनतेसमोर आणत आहोत.डॉ.बाबासाहेब व डॉ.अनिकेत देशमुख हे दोघेही गणपतराव देशमुख यांची परंपरा यशस्वीपणे चालवतील,यात कोणतीही शंका नाही.डॉ. बाबासाहेब व डॉ.अनिकेत हे दोघेही विद्वान असून पक्षाबद्दलची आत्मीयता ते कधीही विसरणार नाहीत.देशमुख कुटुंबामध्ये विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची जबाबदारी माझी व पदाधिकार्‍यांची होती,ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.आता यापुढील जबाबदारी जनतेची असून विजयासाठी सर्वजण रात्रीचा दिवस करतील,अशी अपेक्षा व्यक्त करत,महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा,देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी सांगोला विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे काम करणार असल्याचे मला स्पष्टपणे सांगितले आहे.त्यामुळे शेकापच्यावतीने व सांगोल्यातील जनतेच्यावतीने त्यांचे आभार मानतो.शेकापचे सर्व तरुण उमेदवार विधीमंडळात जाणार असून सध्याचे मंत्रिमंडळ हे आजपर्यंतच्या काळातील सर्वात वाईट सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची वाट लावली असून महाविकास आघाडी भक्कम राहणार असल्याचे भाई जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

या मेळाव्याचे प्रास्ताविक विनायक कुलकर्णी सर यांनी तर,आभार अ‍ॅड. विशालदिप बाबर यांनी मानले. यावेळी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते,मतदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————

नुसत्या डरकाळ्या फोडू नका, मैदानात या आणि कुस्ती धरा :

महाराष्ट्रात सत्तेसाठी विचार,निष्ठा व तत्वांना तिलांजली दिली जात आहे.मात्र,पक्षाच्या संकटाच्या काळात देखील शेतकरी कामगार पक्षाचा कोणताही कार्यकर्ता जागचा हलला नाही,हेच आबासाहेबांच्या निष्ठेचे उदाहरण आहे. ज्याप्रमाणे,आबासाहेबांनी जातीपातीला कधीही थारा दिला नाही,त्याचपद्धतीने मी आणि अनिकेतही काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन उमेदवारी जाहीर केल्याबद्दल सर्वांचे आभार मानत त्यांनी यावेळी विरोधकांना आवाहन केले की, “निवडणूक तिरंगी,चौरंगी किंवा पंचरंगी लागो,आम्हाला कांहीही फरक पडणार नाही,नुसत्या डरकाळ्या फोडू नका,मैदानात या आणि कुस्ती धरा”.
       – डॉ.बाबासाहेब देशमुख (शेकाप उमेदवार)
————————————————

डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे :

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. सांगोला तालुक्याचा दृष्टीने आजचा मेळावा हा ऐतिहासिक क्षण असून आजच्या गर्दीने माझे मन भरुन आले आहे.सांगोल्याचे राजकारण लोकप्रतिनिधींनी ढवळले आहे. विकासाच्या नावाखाली टक्केवारीचे गणित मांडून लोकशाहीला कलंक लावला जात आहे. विरोधकांकडून आम्हा भावंडात मतभेद पसरविण्यासाठी नेहमी प्रयत्न करण्यात आले,आमिषे दाखवण्यात आली.पण, आबासाहेबांची ६० वर्षांची पूंजी आमच्या सोबत आहे ती सहज कशी सुटणार ? आबासाहेबांचा ६० वर्षांचा इतिहास असताना,ही मोळी सुटू देणार नाही,असा विश्वास देत आपण सर्वांनी ताकदीने निवडणूक लढूया आणि जिंकूया. आम्हा दोघांस आज व्यासपीठावर पाहून तालुक्यातील दोघांना झोप येणार नाही. पक्षातील सर्वांनी आता गटतट विसरा,मी आणि बाबासाहेब एकच आहोत आणि एकच राहणार असल्याचे सांगत डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यानीं खंबीरपणे उभे रहावे.      – डॉ.अनिकेत देशमुख
————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button