उपप्रादेशिक परिवहनचे कार्यालय सांगोल्यात मंजूर करावे – आमदार शहाजीबापूंनी दिले मुख्यमंत्र्यांना पत्र

सांगोला :

उपप्रादेशिक कार्यालय नसल्याने वाहन चालक परवाने व तत्सम कामांसाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील वाहन चालकांना ६०-७० कि.मी. अंतरावर असलेल्या सोलापूरला जावे लागते तर, सांगोला तालुक्यातील वाहन धारकांनाही अकलूज येथे ६०-६५ कि.मी.चा प्रवास करावा लागतो. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी आवश्यक असणारी जागा सांगोला नगरपालिकेकडे आरक्षित असून उपलब्ध आहे.त्यामुळे पंढरपूर,सांगोला व मंगळवेढा या तिन्ही तालुक्यांसाठी सांगोला येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करावे,अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सांगोला तालुक्यातील वाहनधारकांना वाहन चालक या परवान्यासाठी व वाहनांच्या इतर कामांसाठी ६०-६५ कि.मी.चा प्रवास करुन अकलूजला जावे लागते. तसेच पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील वाहन धारकांना सोलापूरला जावे लागते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहन परवान्याची कामे सुलभ व जलद होण्यास अडचणी येतात. गर्दीमुळे कामे न झाल्यास वाहन चालकांना निराशेपोटी परत जावे लागते. त्यासाठी संपूर्ण दिवसही वाया जातो व आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. त्याकरिता,उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा विचार व्हावा,अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

सोलापूर व अकलूज येथील असणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर कामकाजाचा अधिक भार असल्याने ग्रामीण भागातील लोकांची वेळेत कामे पूर्ण होत नाहीत.पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील लोकांना सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तर,सांगोल्यातील वाहनधारकांना अकलूज येथील कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सांगोला,पंढरपूर व मंगळवेढा या तिन्ही तालुक्यातील वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेता,पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांपासून सांगोल्याचे अंतर हे २५ ते ३० कि.मी.अंतरावर आहे. तसेच सांगोला येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकरीता आवश्यक असणारी जागा ही सांगोला नगरपालिकेकडे आरक्षित असून उपलब्ध आहे.

                         त्यामुळे पंढरपूर,सांगोला व मंगळवेढा या ३ तालुक्यांसाठी स्वतंत्र सांगोला येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करावे,अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन सांगोल्यासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
——————————————————————————