सांगोला :
नीरा नदीवरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. धरणातील अतिरिक्त पाणी नदीला सोडण्याऐवजी दुष्काळी सांगोला विधानसभा मतदार संघातील तिसंगी,चिंचोलीसह लाभक्षेत्रातील छोट्या-मोठ्या तलावांना सोडण्यात यावे.तसेच तिसंगी प्रमाणे चिंचोली तलावालाही निरा उजवा योजनेचा टेल टॅंक म्हणून जाहीर करावे,अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांच्याकडे केली आहे.
उन्हाळी आवर्तन २०२४ मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील कांही फाट्यांना अपुरे पाणी मिळाले होते.यामुळे निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. तसेच गेल्या आवर्तनात तिसंगी,चिंचोलीसह लाभक्षेत्रातील अन्य छोटे-मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने या तलावाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांची आणि शेतीची तहानही भागली नव्हती. सध्या धरणात प्रचंड पाणीसाठा उपलब्ध आहे तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाची दमदार हजेरी सुरु आहे. त्यामुळे सध्या,धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून धरणातील अतिरिक्त पाणी नीरा उजवा कालव्यातून तिसंगी आणि चिंचोली हे मोठे तलाव तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील निरा उजवा कालव्यावर असणारे छोटे तलाव आणि सांगोला शाखा कालव्याला पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,असेही माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगीतले.
—————————————————————
टेल टॅंक म्हणून जाहीर केल्यास हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल :
निरा उजवा कालव्याच्या तळाला किंवा टेलला असणारा चिंचोली तलाव हा टेल टॅंक म्हणून जाहीर करावा आणि दरवर्षी हा तलाव नियमितपणे नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून भरुन द्यावा.चिंचोली तलावात नियमितपणे पाणी सोडल्यास या पाण्यातून चिंचोली, सांगोला व बामणी या गावातील हजारो शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे व या पाण्यातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.
– दीपकआबा साळुंखे-पाटील
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने