सांगोला :
पाण्यापासून वंचित राहिलेल्या सांगोला तालुक्यातील १२ गावांसाठी वरदायिनी असलेल्या बहुप्रतिक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यातील सुमारे २९९ कोटी २१ लाख ३३ हजार रुपयांची निविदा नुकतीच प्रसिध्द झाली असून या योजनेमुळे तालुक्यातील सुमारे ३९ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक १,२ व ३ पंपगृहाचे बांधकाम व उर्ध्वगामी नलिका क्र.१,२- अ,२-ब, व ३ चे बांधकाम तसेच वितरण कुंड क्रमांक १,२ व ३ चे बांधकाम,चिकमहूद व इटकी या मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेचे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करणे व पाणी वापर संस्था स्थापन करुन सिंचन क्षेत्र हस्तांतरित करणे.५ वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम तसेच अजनाळे गुरुत्वीय नलिकेद्वारे सांगोला शाखा क्रमांक ५ साठी फिडर नलिकेच्या कामाची पहिल्या टप्प्यातील सुमारे २९९ कोटी २१ लाख ३३ हजार रुपयांची निविदा नुकतीच प्रसिध्द झाली असून दुसऱ्या टप्प्यातील २५० कोटींची निविदाही आठवडाभरात प्रसिध्द होणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
सन १९९७ मध्ये मंजूर झालेल्या ७३.५९ कोटी रुपयांच्या सांगोला उपसा सिंचन योजनेच्या कामाला २००० साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी १६ हजार एकर क्षेत्र यामध्ये समाविष्ट होते. सदर योजनेच्या कोणत्याही कामाला सुरुवात न झाल्याने मंजुरीनंतर २००६ साली याची प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली होती.२०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी २०२० सालापासून या कामाचा सातत्याने पाठपुरावा करुन नव्याने १२ वंचित गावे व सांगोला शाखा कालव्यावरील उच्च भागामध्ये असणारी गावे यासाठी प्रस्ताव तयार करुन सुमारे ३९ हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला.
शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे वारंवार पाठपुरावा करुन या योजनेसाठी हा निधी उपलब्ध करुन घेतला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने १७ नोव्हेंबर २०२२ मध्ये सांगोला उपसा सिंचन योजनेचे “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना,सांगोला” असे नामकरण केले.
———————————————————————
## – असा असेल स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्प :
सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित ८८३ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रत्यक्ष कामासाठी ७८९ कोटी ५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.तर,अनुषंगिक कामासाठी ९२ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.बंदिस्त नलिका करण्यासाठी २५७ कोटी ३४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तर,पाणी वापर संस्था व प्रशिक्षण यासाठी ३ कोटी ५० लाख ६७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आस्थापना, संयंत्रे व इतर खर्चासाठी ९२ कोटी ८५ लाख ४२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
या योजनेतून दीड टीएमसी पाणी बंदीस्त वितरण नलिकेतून लक्ष्मीनगर,अचकदाणी,बागलवाडी, सोनलवाडी,अजनाळे,वाकी-शिवणे, नरळेवाडी, य.मंगेवाडी,बंडगरवाडी,चिकमहूद,कटफळ,खवासपूर,जुनी लोटेवाडी,नवी लोटेवाडी व इटकी या गावांतील सुमारे ३३ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर अर्धा टीएमसी पाण्यातून सांगोला शाखा कालवा ५ वरील सुमारे ६ हजार एकर असे एकूण ३९ हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार.
– आमदार शहाजीबापू पाटील
———————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने