ओबीसी समाजाच्या वतीने सांगोला बंदची हाक

सांगोला :

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,या मागणीसाठी तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावासाठी ओबीसी समाजाच्या वतीने शुक्रवारी २१ जून रोजी सांगोला तालुका बंदची हाक देण्यात आली असून बंदबाबतचे निवेदन सांगोल्याचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

           सांगोला तालुक्यातील सर्व ओबीसी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काल गुरुवारी सांगोला येथे बैठक पार पडली व त्या बैठकीत ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावासाठी सांगोला तालुका बंद ठेवण्याचे तसेच नाझरा टोळ नाका येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सांगोला बंदचे निवेदन देण्यात आले. यावेळी,सर्व छोटे-मोठे उद्योग व व्यवसाय बंद ठेवून व्यापारी वर्गही सहकार्य करतील,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

                          ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री,अंबड येथे तसेच पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगेश ससाणे, मृणाल ढोले व पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा विरोध नाही.परंतु ओबीसी समाजावर अन्याय करुन आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,अशी ओबीसी समाजाची मागणी आहे.

           बंदबाबतचे निवेदन देतेसमयी,शेकापचे युवानेते डाॅ.बाबासाहेब देशमुख,माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर,सांगोला सूतगिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी,उद्योगपती बाळासाहेब एरंडे,माजी नगरसेवक आनंदा माने व शिवाजी बनकर,दत्ता जानकर,सुरेश आदाटे,माळी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सोमनाथ राऊत,सावता परिषद सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष सयाजी बनसोडे,उल्हास धायगुडे-पाटील,अमोल खरात,तानाजी खंडागळे,ज्ञानेश्वर इमडे,यशवंत सेनेचे सांगोला तालुकाध्यक्ष आनंदा मेटकरी,सावता परिषदेचे सांगोला तालुका अध्यक्ष संतोष टाकळे,मनसे अध्यक्ष विशाल गोडसे,संतोष कारंडे,सोमनाथ आदलिंगे,प्रतिक बनसोडे,समता परिषद सांगोला तालुकाध्यक्ष मधुकर माळी,समता परिषदेचे शहराध्यक्ष भैरवनाथ बुरांडे, महेश बनकर,नाथपंथी डवरी-गोसावी संघटनेचे शिवाजीराव इंगोले,शिवसेना नेते समाधान कोळेकर यांचेसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
——————————————————————————