सांगोला :
चालू वर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शासनाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यासह बार्शी व माळशिरस या ३ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ तर,करमाळा व माढा या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून या अंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सवलतींची प्रभावी अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचा विश्वास आम.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने मंगळवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात, राज्यातील इतर जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यासह वरील तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सन २०२३ च्या खरीप हंगामाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे राज्यातील १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यमानाची तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता,पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्वांचा एकत्रित विचार करून या ४० प्रभावित तालुक्यातील आपत्ती विचारात घेऊन हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय आहे. कोरडवाहू पिकांसाठी ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना प्रत्यक्ष पीक पेरक्षेत्रासाठी अनुदान दिले जाईल. फळ पिके व बागायती पिकांचा पंचनामा करून हे अनुदान दिले जाईल. शाळांमध्ये दीर्घ सुट्टीच्या कालावधीतही मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येईल.एकात्मिक बाल विकास व मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात येईल.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
* सवलतींबाबत नियमांचे उल्लंघन करणार्या अधिकार्यांवर कारवाई करणार :
सांगोला तालुक्यात चालू वर्षाच्या खरीप हंगामात सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडला असून याबाबत गेल्या २ महिन्यांपासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी याची दखल घेऊन गंभीर दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये सांगोल्याचा समावेश केला आहे. दुष्काळी तालुक्यांतर्गत मिळणारी प्रत्येक सवलत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पूर्ण वेळ काम करणार आहे. पुढील ६ महिने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करत राहीन. शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या सवलतींबाबत जे अधिकारी नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही.
– आमदार शहाजीबापू पाटील ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
* दुष्काळी तालुक्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सवलती :
दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्यांसाठी जमीन महसुलात सूट,पीक कर्जाचे पुनर्गठण,शेतीशी निगडित कर्ज वसुली स्थगिती,कृषी पंपांचे चालू बिलात ३३.५ टक्के सूट,विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता,पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे अशा प्रकारच्या सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने