सांगोला :
सांगोला तालुका हा टेंभू व म्हैसाळ योजनेच्या शेवटी म्हणजे टेलला आहे त्यामुळे प्रत्येकवेळी सांगोला तालुक्याला टेंभू व म्हैसाळ योजनेचे पाणी देत असताना सबंधित प्रशासनाचे नियोजन नसल्याने पाणीवाटपात नेहमीच सांगोला तालुक्यावर अन्याय होत आला आहे.परंतु,रब्बी व उन्हाळी हंगामाच्या आवर्तनात सांगोला तालुक्यावर होणारा अन्याय यापुढे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही,असा कडक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी टेंभू-म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या नियोजन बैठकीत आक्रमक होत दिला.
कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू उपसा सिंचन या योजनांची कालवा सल्लागार समितीची बैठक रविवार दि.२९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीदरम्यान माजी आमदार दिपकआबा हे बोलत होते.यावेळी
बोलताना दिपकआबा म्हणाले की, आगामी रब्बी व उन्हाळी हंगामाचे पाणी वाटपाचे नियोजन करत असताना टेल टू हेड प्रमाणे सर्वप्रथम सांगोला तालुक्यातील शेतीला मिळाले पाहिजे. सांगोला तालुक्यात चालूवर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अशावेळी सांगोला तालुक्यातील रब्बीची पिके तसेच नागरिकांना आणि जनावरांना जीवनदान देण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन व्यवस्थित करून नियमाप्रमाणे पाणी वाटप करावे आणि सबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष देऊन याची खातरजमा करावी, असेही यावेळी माजी आमदार दिपकआबा यांनी स्पष्ट केले.
रब्बी हंगामाचे म्हैसाळ योजनेचे पंप १७ नोव्हेंबर रोजी चालू होतील व टेंभू योजनेचे रब्बी हंगामाचे पंप १५ डिसेंबर रोजी चालू होतील. टेंभूचे पाणी १५ जानेवारी पर्यंत सांगोला तालुक्यामध्ये पोहोचेल आणि या पाण्यामधून दोन्ही योजनांचे रब्बी हंगामाचे आवर्तन यशस्वी केले जाईल,असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तसेच टेंभू व म्हैसाळ या दोन्ही योजनांचे आवर्तन नियमाप्रमाणे पूर्ण होतील,असेही आवर्जून नमूद केले.
कालवा सल्लागार समितीच्या सदर बैठकीसाठी खासदार संजयकाका पाटील,आमदार शहाजीबापू पाटील,आमदार अनिलभाऊ बाबर, आमदार सुमनताई पाटील,आमदार विश्वजीत कदम,आमदार समाधान आवताडे,आमदार विक्रम सावंत,आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर,माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
—————————————————————————
More Stories
गावागावात,क्लस्टर स्तरावर शेतमाल खरेदी केंद्रांचे जाळे विस्तारुन ‘प्राईस डेफिशियन्सी पेमेंट’सारखी प्रणाली लागू करावी – खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर