सामाजिक

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान व रोटरी क्लब यांच्यावतीने सांगोल्यात बचत गट महिला मेळावा उत्साहात संपन्न

 

सांगोला :

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठानच्या बचत गटातील महिलांचा २६ वा वार्षिक मेळावा सांगोल्यात मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला.

                 मेळाव्याच्या प्रारंभी,दीप प्रज्वलन करण्यात आल्यानंतर गीत गायन व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांची व रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. साजिकराव पाटील यांची ओळख नीता लाटणे यांनी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी यांनी केले. यासमयी,बचतगट विभागाच्या वार्षिक अहवालाचे नीता लाटणे यांनी तर,मातृप्रबोधन वर्गाच्या वार्षिक अहवालाचे वाचन अर्चना कांबळे यांनी केले.यानंतर संस्थेतर्फे कै.डॉ. तारा गोडबोले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘श्रमलक्ष्मी’ पुरस्कार संस्थेच्या बचतगटातील सभासद उषा दहीवडकर यांना तर,रोटरी क्लब तर्फे देण्यात येणारा ‘रणरागिणी’ पुरस्कार बचतगटातील सभासद श्रीमती ज्योती कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.तसेच कै.स्नेहा देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा ‘जिद्द’ पुरस्कार सोनंद येथील बचतगट प्रमुख सविता कोळसे- पाटील यांना देण्यात आला.

प्रमुख मार्गदर्शक चंद्रीका चव्हाण यांनी ‘उद्योजकता’ याबाबत महिलांना मार्गदर्शन केले.शेतकरी कुटुंबातील महिलांनी शेतीपूरक व्यवसाय कसा करावा ? व स्वतःबरोबरच कुटुंबाचा विकास कसा करावा ? याबाबत माहिती सांगितली आणि महिलांनी एकत्र व्यवसाय करून एकमेकींना मदत करावी,असे सांगितले.यावेळी,
२२ जानेवारी रोजी होणार्‍या अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास येण्यासाठी सांगोल्यातील महिलांना आवाहन करण्यात आले.नंतर,रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.साजिकराव पाटील यांनी ‘आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर,महिलांनी अगोदर टीव्ही वरील मालिका पाहणे बंद करायला हवे.टीव्ही बघून आपली नवीन पिढी त्याचे अनुकरण करायला लागली आहे.आपली पिढी संस्कार क्षम करायला हवी,मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवेत,यासाठी त्यांनी चांगले बघायला,ऐकायला हवे,याची सुरुवात घरापासूनच करायला हवी. महिला सर्व कांही करु शकतात. महिलाच घर सांभाळत असते.फक्त पुरुष कमावतो.म्हणून तो कुटुंबप्रमुख असतो.पण खरा संसार महिला सांभाळत असते,अशा शब्दात महिलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले.याप्रसंगी,रो. माणिकराव भोसले म्हणाले की,काल शेतकरी दिवस होता,आपल्या देशात महिलाच उत्तम शेती करतात आणि उत्तम प्रकारे घरही सांभाळतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.मोना रत्नपारखी यांनी यावेळी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या तसेच यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर बचतगटात घेण्यात आलेल्या स्पर्धांचे तसेच मातृप्रबोधन वर्गातील स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचबरोबर,बचतगटातील पु. अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त महिलांचा सत्कार करण्यात आला. जे.एच.कलेक्शन व रत्नपारखी ज्वेलर्स यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.रत्नपारखी ज्वेलर्सकडून महिलांना कुपन देण्यात आले होते,त्याच्या लकी ड्रॉ मधून ५ महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी तर,आभार मंगल कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रमात रोटरीतर्फे महिलांना अल्पोपहार व चहा देऊन संस्थेच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

  या कार्यक्रमास संस्था अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर,खजिनदार डॉ.शालिनी कुलकर्णी,विश्वस्त डॉ.केतकी देशपांडे,शालिनी पाटील व श्रीमती श्रीदेवी बिराजदार तसेच रोटरी अध्यक्ष डाॅ.साजिकराव पाटील व इतर सभासद तसेच माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.सदर मेळाव्यास ५०० पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button