माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोल्यात बचतगट महिला मेळावा

सांगोला :

सांगोला येथील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी सकाळी ११ वा.बचत गटातील महिलांचा वार्षिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला या संस्थेच्या मेळाव्याचे हे २६ वे वर्ष असून गेल्या कांही वर्षापासून रोटरी क्लब ऑफ,सांगोला यांचेवतीने संस्थेच्या मेळाव्यासाठी सहकार्य केले जात आहे.या संस्थेच्या आलेगाव-मेडशिंगी रोडवरील उत्कर्ष विद्यालयात हा मेळावा संपन्न होणार असून या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जी.आर.रत्नपारखी ज्वेलर्सच्या डॉ.मोना रत्नपारखी या उपस्थित राहणार आहेत. तर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोलापूर येथील ‘उद्योगवर्धिनी’ या संस्थेच्या संस्थापिका,राष्ट्रीय सेवा भारतीच्या विश्वस्त सौ.चंद्रिकाताई चव्हाण या उपस्थित राहणार आहेत. ‘उद्योजकता’ या विषयांवर त्यांचे मार्गदर्शन होणार असून या मेळाव्यात संस्थेच्या बचतगटातील ३ महिलांना पुरस्कारही देण्यात येणार आहे.

एक पुरस्कार बचत गटातील कष्टातून सबल व सक्षम झालेल्या एका महिलेस ‘कै.डॉ.तारा गोडबोले स्मृती श्रमलक्ष्मी पुरस्कार’ व ‘रणरागिणी’ हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ,सांगोला यांच्यातर्फे देण्यात येणार असून कै.स्नेहा देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘जिद्द’ पुरस्कार देण्यात येणार आहे.तसेच वर्षभरात मातृ प्रबोधन मंचातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांचा आणि यावर्षी शासनातर्फे ‘पु.अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ मिळालेल्या बचतगट सभासदांचा सत्कार करण्यात येईल.यावेळी मातृप्रबोधन मंचातर्फे महिलांचे विविध करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.

सध्या संस्थेत सुरु असलेल्या मिटकॉन व ओंकारा अँसेट मॅनेजमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी बॅग,ज्यूट बॅग प्रशिक्षणातील महिलांनी तयार केलेल्या बॅग्ज तसेच मागील ‘क्लिनिंग प्राॅडक्ट्स’ च्या प्रशिक्षणात शिकविलेल्या विविध वॉशिंग पावडर,भांड्याची पावडर,हँडवाॅश,फिनेल, हार्पिक इ.पदार्थांचा आणि बचतगट महिला सभासदांचा खाद्य पदार्थांचा विक्री स्टाॅल लावण्यात येणार आहे.तरी,या कार्यक्रमास बचतगटातील सर्व सभासदांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे,असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर व रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ.साजिकराव पाटील यांनी केले आहे.
———————————————————————————