सांगोला शहरातील १२५ कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या कामाला अखेर मंजुरी – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला :

मागील १२ वर्षापासून रेंगाळत असलेल्या सांगोला शहरातील सुमारे १२५ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून काल शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ९६ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

            सन २०११ पासून प्रलंबित असलेल्या सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला मंजूरी मिळण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता. सुरुवातीला ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या योजनेचा खर्च आता १२५ कोटी रुपयांपर्यंत गेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजीबापूंच्या मागणीला मान्यता देऊन निधी मंजूर केला आहे. त्यामधील टप्पा क्रमांक १ च्या कामासाठी ९६ कोटी ६३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत या योजनेला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्याच्या कामासाठी एकूण ९६ कोटी ६३ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ८६ कोटी ९६ लाख रुपये महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळणार असून उर्वरित ९ कोटी ६६ लाख रुपये सांगोला नगरपरिषदेला द्यावे लागणार आहेत.

पहिल्या टप्प्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया क्षमता, विविध ठिकाणी सांडपाणी गोळा करण्याची व्यवस्था करणे, जलशुद्धीकरण केंद्राजवळ सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, यामध्ये ट्रंकमेन,पंपिंग स्टेशन,जलशुद्धी केंद्र व नालाबंध ही कामे पूर्ण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये मल वाहिन्यांची व्यवस्था करून पहिल्या टप्प्यांमध्ये निर्माण केलेल्या मल प्रक्रिया व्यवस्थेस जोडण्यात येणार आहे. सदरचे काम सांगोला नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार असून यासाठी लवकरच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे.मंजूरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून आम.शहाजीबापू पाटील यांनी सदरच्या योजनेच्या कामाला २ महिन्यांमध्ये सुरुवात केली जाणार असून चांगल्या कंत्राटदारांकडून गुणवत्तापूर्वक काम वेळेत करुन घेणार असल्याचे सांगितले.
————————————————

*  भुयारी गटारीचे काम झाल्यावर शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणार : 

बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेल्या सांगोला शहर भुयारी गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाल्याने सांगोला शहरातील आरोग्याचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.यामुळे शहराच्या विकासामध्ये मोठी भर पडणार असल्याने गटारीचे काम झाल्यावर लगेच सांगोला शहरातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नवीन योजना मंजूर करणार.                                                                            – आमदार शहाजीबापू पाटील

—————————————————————————