सांगोला :
सांगोला नगरपरिषद हद्दीतील त्रिमूर्ती टॉकीज समोर (आरक्षण क्रमांक ३१) व्यापारी संकुल बांधणे या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना,आमदार शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, चालू पावसाळी अधिवेशनात मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला नगरपरिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत १० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच या चालू अधिवेशनातच सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनही ३५ कोटींचा निधी मंजूर झाला असून सांगोला विधान सभा मतदार संघासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला असल्याने सांगोला शहरासह ग्रामीण भागाचाही भविष्यात मोठा विकास होणार आहे.
सांगोला नगरपरिषद हद्दीतील व्यापारी संकुल बांधण्याच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे या मंजूर निधीतून सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व्यापारी संकुलाचे बांधकाम होणार आहे. त्यामुळे सांगोला शहराच्या विकासात मोठी भर पडणार असून सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,अशी माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
नव्याने होणार्या व्यापारी संकुलामुळे सांगोला शहराच्या विकासात भर पडणार :
व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्वावर हस्तांतरीत करुन उत्पन्न मिळविणे हा नगरपरिषदांसाठी एक महत्वाचा उत्पन्नाचा मार्ग असून नगरपरिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागा व अरुंद रस्त्यांच्या बाजूच्या जागा,अशा जागांवर अनधिकृत बांधकामे होऊन जागेचा गैरवापर होऊ नये आणि उलट अशा जागा विकसीत करुन त्यातून नगरपरिषदेस उत्पन्न प्राप्त होईल व मिळणारा अतिरिक्त निधी नगरपरिषदेच्या इतर विकास कामांसाठी वापरता यावा, म्हणून अशा जागांवर व्यापारी गाळे बांधून हे गाळे मुदतीने लिलाव प्रक्रियेद्वारे भाडे तत्वावर हस्तांतरण करणे आवश्यक असते.

याच उद्देशाने,सांगोले नगरपरिषद हद्दीतील त्रिमूर्ती टॉकीज समोरील आरक्षण क्रमांक ३१ मधील मोकळया जागेत १० कोटी रुपये खर्चून व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून या व्यापारी संकुलामुळे शहरातील तसेच तालुक्यातील व्यापारी वर्ग,सुशिक्षित बेरोजगार युवक व इतर गरजू लोकांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी गाळे उपलब्ध होणार आहेत. तसेच या गाळ्यांच्या भाड्यामधून मिळणाऱ्या रकमेतून नगरपरिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार आहे आणि या उत्पन्नातून मिळणारा निधी हा नगरपरिषद हद्दीतील विकास कामांसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे नव्याने होणारे व्यापारी संकुल (व्यापारी गाळे) हे निश्चितच सांगोला शहराच्या विकासात भर घालणारे असून शहरातील व्यापारी व नागरिक यांच्या विकासासाठीही उपयुक्त ठरणार आहेत.
– मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने