सांगोले नगरपरिषद अंतर्गत शहर उपजीविका केंद्राचे आम.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

 

सांगोला :

सांगोला नगरपरिषद अंतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ म्हणून नगरपरिषद कार्यालय येथील “सोनचीरीया” या शहर उपजीविका केंद्राचे उदघाटन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते काल शुक्रवारी करण्यात आले. यावेळी, तहसिलदार संजय खडतरे, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी,माजी नगरसेविका स्वातीताई मगर, छायाताई मेटकरी,अप्सराताई ठोकळे,शहर स्तर संघ अध्यक्षा सुनंदा घोंगडे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आम.शहाजीबापू पाटील म्हणाले की, सांगोला नगरपरिषदेमार्फत सुरु करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून बचत गटातील तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री महोदयांकडे तातडीने पाठपुरावा करणार. तसेच सांगोला शहरातील व परिसरातील सर्व बचत गटांच्या व्यवसाय वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगीतले. यासमयी बोलताना मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी म्हणाले की, सांगोला शहरामध्ये बचत गटाचे मोठे काम उभे झाले असून बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना शहरामध्ये एक व्यासपीठ मिळण्या करिता शहर उपजीविका केंद्राची स्थापना करण्यात येत असून सदर केंद्रांतर्गत सांगोला शहरातील नागरिकांना शहरातील विविध शासकीय योजना,व्यावसायिक व कारागीर (सुतार,नळजोडणी करणारे,इलेक्ट्रिशियन इ.) यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याचे सांगीतले.

या कार्यक्रमासाठी सांगोला शहरातील विविध बचत गटातील सुमारे ३५० हून अधिक महिला उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन मनीषा हुंडेकरी यांनी केले.या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधिक्षक तृप्ती रसाळ,सहा. प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे,बिराप्पा हाके,शरद थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

—————————————————————————