राज्यातील काका-पुतण्याच्या संघर्षाची सांगोल्यालाही झळ

 

सांगोला :

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या काका- पुतण्यांच्या मुंबईतील बैठकीत सांगोल्याचे राष्ट्रवादीचे नेते तसेच प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यासपीठावर तर, त्यांची सख्खी बहीण असलेल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड या मात्र शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या दिसून आल्या. अर्थातच राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या काका-पुतण्याच्या सत्ता संघर्षाची झळ आता सांगोल्यातील बहीण-भावालाही बसल्याने राजकीय वर्तुळात हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेपासून फारकत घेत अजितदादा पवार हे भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने बरोबर सत्तेत सामील झाले. अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी पक्षांतर्गत बंडाचे दंड थोपटून आपली वेगळी भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते पदावरून ते थेट राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. परंतु घरामध्येच फूट पडल्याने राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळी उफाळून आली. या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या राज्यभर वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत. बुधवार दि.५ जुलै रोजी राष्ट्रवादी मधीलच काका व पुतण्यांच्या दोन वेगवेगळ्या बैठका सुरू झाल्या. अनेक आमदार,माजी आमदार,खासदार व पक्षातील पदाधिकार्‍यांपैकी कांहीजण काकांकडे तर कांहीजण पुतण्याकडे गेल्याचे दिसून आले. माजी आमदार व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले तसेच सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आठ वर्षे तर ४ वर्षे राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले दीपकआबा साळुंखे-पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यासपीठावर बसलेले दिसून आले तर,त्यांची सख्खी बहीण असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड या मात्र,शरद पवार यांच्या गटामध्ये सामील झाल्या आहेत. ज्याप्रमाणे, राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या दिसून आल्या तशीच भूमिका माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या घरांमध्येही घेतलेली दिसून आली.
————————————————

राज्याप्रमाणे सांगोल्यातही अगोदरच या पॅटर्नची सुरुवात :

या अगोदर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शेतकरी कामगार पक्षांमध्ये राज्यात आघाडी झाली होती. परंतु शिवसेनेचे उमेदवार असलेले विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासाठी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी वेगळी भूमिका घेऊन शेकापच्या उमेदवाराच्या विरोधात आम.शहाजी बापू पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते. त्यांच्या पाठिंबामुळेच अल्पमतात का होईना शहाजीबापू पाटील हे आमदार झाले. त्यामुळे सध्या सेना-भाजप व राष्ट्रवादीची युती झाली आहे,तशी युती या अगोदर सांगोला विधानसभेच्या वेळी व त्यानंतर झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये दीपकआबा साळुंखे-पाटील व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या माध्यमातून सांगोल्यातून सुरुवात झालीच होती.
————————————————
पवारसाहेब आमच्यासाठी आजही दैवतच :

अनेक वर्षे पवार साहेबांसोबत माढा लोकसभा आणि सांगोला विधानसभा निवडणुकीत काम पाहिले. साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणेच आपण राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहोत.परंतु,आम्ही जी मतदार संघातील जनतेला विकासाची स्वप्ने दाखवली आहेत,ती पूर्ण करणे हे देखील आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार साहेब हे माझ्यासाठी कायमस्वरूपी दैवतच राहतील.
     – दिपकआबा साळुंखे-पाटील
—————————————————————————