सांगोला शहरातील फेरीवाल्यांचे व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी कटीबध्द – आनंदा माने

 

सांगोला :

  सांगोला शहरातील वंदे मातरम चौक येथे जागा धरुन भाड्याने देण्याच्या हेतूने व रस्त्यास अडथळा होत असल्यामुळे तेथील अतिक्रमण काढण्याबाबतची मागणी आम्ही केलेली होती. परंतू कांही लोकांनी संपूर्ण शहरातील सरसकट अतिक्रमण काढण्याची मागणी केल्याने नगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण काढले आहे. शहरातील ज्या फेरीवाल्यांचे चालू व्यवसाय बंद झाले आहेत,अशा फेरीवाल्यांचे व्यवसाय पुन्हा सुरु करण्याबाबत आ.शहाजीबापू पाटील व मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांना भेटून गोरगरीबांचे व्यवसाय पुन्हा पूर्वीच्याच जागा भाडेतत्वावर देण्यासाठी प्रयत्न करुन त्यांचे व्यवसाय सुरु करण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही माजी नगरसेवक आनंदा माने यांनी दिली आहे.

सांगोला शहरामध्ये ठिकठिकाणी बाहेरचे लोक येवून न.पा.च्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा दुसर्‍यास भाडेतत्वावर देण्याचे प्रकार सुध्दा वाढले होते,अशा लोकांची अतिक्रमणे निघाल्यामुळे त्यांच्याकडून या अतिक्रमणाबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे प्रकार सुध्दा झाले आहेत. परंतू सरसकट अतिक्रमण काढण्याची मागणी कुणी केली होती ? हे नागरिकांना चांगलेच माहित आहे.त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपालिका फेरीवाला व्यवसायाचे (विनियमन) आदर्श उपविधी २००९ अंतर्गत मुख्याधिकारी यांनी शहर फेरीवाला समितीची स्थापना करून शहरामध्ये फिरता फेरीवाला व स्थिर फेरीवाला अशी वर्गवारी करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी नगरपालिकेने परवाना द्यावा व फेरीवाल्यांकरीता शहरामध्ये जागांचे नियोजन करावे. मुख्याधिकारी यांनी शक्यतो,पहिले फेरीवाले ज्याठिकाणी होते,तीच जागा त्यांना वार्षिक भाडेतत्वावर द्यावी, अशी मागणीही आनंदा माने यांनी केली आहे.
————————————————

फेरीवाल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार :

अतिक्रमणामुळे ज्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत,अशा सर्वांना आधी होती तीच जागा नगरपालिकेने भाडेतत्वावर द्यावी,या मागणीकरीता आमच्या गटामधील शहराच्या माजी लोकनियुक्त सौ.राणीताई माने,मा.उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर व आमचे इतर नगरसेवक यांच्यासमवेत तालुक्याचे आ.शहाजीबापू पाटील व मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांची भेट घेवून फेरीवाल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार.
                                  – माजी नगरसेवक आनंदा माने
——————————————————————————