सांगोला :
सांगोला शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांकडून वारंवार होत असलेल्या तक्रारीची दखल घेवून अखेर,मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या सुमारे ९० कर्मचार्यांचा फौजफाटा घेवून कडक पोलीस बंदोबस्तासह गुरुवारी अतिक्रमणधारकांविरुध्द कारवाईचा बडगा उगारल्याने सांगोला शहरातील जवळजवळ सर्वच रस्ते चकाचक झाले असून दबंग मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सांगोला शहरातील सार्वजनिक जागेवर, मुख्य रस्त्यावर,बगीचाचे भोवती व महापुरुषांच्या पुतळ्या लगत वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल,अशारितीने अतिक्रमण करुन फेरीवाल्यांनी बेशिस्तपणे लावलेले हातगाडे, उभ्या राहिलेल्या टपऱ्या,दुकानाबाहेर रस्त्याला खेटूनच लावलेले साहित्य आणि व्यावसायिकांचे जाहिरात बोर्ड या सर्व अस्ताव्यस्तपणामुळे सांगोला शहराच्या सौंदर्याचे अक्षरश: विद्रूपीकरण झाल्यामुळे शहरातील नागरिकांचा व ग्राहकांचा जीव नकोसा झाला होता.ही अतिक्रमणे काढण्याकरिता विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून नगरपरिषदेस वारंवार निवेदने व तक्रारी अर्ज दिले जात होते.
अखेर नागरिकांच्या मागणीनुसार सांगोला नगरपरिषद प्रशासनाकडून गुरुवारी २५ मे रोजी पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख चौक,महापुरुषांचे पुतळे,नगरपरिषद मालकीचे बगीचे आणि वाहतुकीस व रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणची अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.शहरातील मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी बेशिस्तपणे लावलेले हातगाडे,टपऱ्या,जाहिरात बोर्ड व दुकानाबाहेरील साहित्य नगरपरिषदेमार्फत हटविण्यात आले. तसेच अतिक्रमणे हटविलेल्या जागी सांगोला नगरपरिषदेमार्फत लागलीच खड्डे करुन वृक्षारोपणही करण्यात आले.
——————————————
भाजीपाला व फळ विक्रेत्यांची नवीन भाजी मंडईत सोय :
सांगोला शहरातील अतिक्रमण हटाव कार्यवाहीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी नगरपरिषदेमार्फत महापालिकेच्या धर्तीवर अतिक्रमण निर्मूलन पथकाची स्थापना करण्यात येणार असून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याकामी नियुक्त करण्यात येणार आहेत. सदर पथकामार्फत शहरातील संपूर्ण अतिक्रमणावर सातत्याने नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.तसेच शहरातील उर्वरित भागातील अतिक्रमणे देखील पुढील टप्यात लवकरच काढणार आहे. शहरातील भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या भाजी मंडई येथे पुरेशी जागा उपलब्ध असून त्याठिकाणी सर्व आवश्यक सोईसुविधा नगरपरिषदे मार्फत पुरविण्यात येणार आहेत. शहरातील उर्वरित ठिकाणी असलेले अतिक्रमण सर्व अतिक्रमण धारकांनी स्वत: काढून नगरपरिषदेस सहकार्य करावे.
– मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
——————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने