सांगोला :
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साऱ्या विश्वात मोठ्या उत्साहात साजरी केली जात असली तरी, डोंगराच्या कुशीत असलेल्या सांगोला तालुक्यातील पाचेगांव बु॥ येथील भीम अनुयायांनी संपूर्ण महिलांचेच जयंती उत्सव मंडळ स्थापन करुन वेगळाच आदर्श निर्माण केला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाची कमान यावर्षी महिलांच्या हाती दिली आणि महिलांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या जल्लोषात पार पाडून ही कमान मोठ्या हिमतीने सांभाळली.
सांगोला तालुक्यातील पाचेगांव बु॥ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त ५ मे रोजी आयोजित करण्यात आलेला जयंती उत्सव सोहळा मोठया दिमाखात संपन्न झाला.यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य व सवाद्य मिरवणूक पाहून गावकर्यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी खासकरुन सेक्युलर मुव्हमेंटचे प्रदेश कार्याध्यक्ष भरत अण्णा शेळके यांनी आवर्जून भेट देऊन मंडळाचे कौतुक केले. संपूर्ण महिलांचेच जयंती उत्सव मंडळ असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण असून राज्याच्या ग्रामीण भागातील महिला मोलमजुरी करत आपले जीवन व्यतित करतात. परंतु बचत गटाच्या माध्यमातून आता महिला या शहरांबरोबर खेड्यात सुध्दा नेतृत्व करताना पहायला मिळत असून पाचेगांव बु॥ येथील महीलांनीही बचत गटाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधत यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे नेतृत्व केले. रमाईच्या, सावित्रीच्या व जिजाऊंच्या लेकीनी आपल्याल्या संधी मिळाली तर, आपणही समाजाचे नेतृत्व करु शकतो, हे दाखवून दिले. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.नेहमीप्रमाणे बचत गटाच्या बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यावर चर्चा झाली. त्यावेळी यावर्षीची जयंती आपण माहिलांनी साजरी करायची असे ठरवून जयंती उत्सव मंडळ तयार करण्यात आले.यावेळी अध्यक्षपदी कविता दगडू कांबळे, उपाध्यक्षपदी प्रियांका कांबळे तर,खजिनदार पदी लतिका कांबळे यांची निवड करण्यात आली.तसेच सदस्य म्हणून मंदाकिनी कांबळे,प्रिया कांबळे,सरिता कांबळे,कमल कांबळे,सुवर्णा कांबळे,पुष्पा शिवशरण,नंदा कांबळे, सविता कांबळे,कौशल्या कांबळे, बायना कांबळे आदी सदस्यांची निवड करण्यात आली आणि हा प्रस्ताव समाजापुढे मांडून त्याला संमती मिळविली. त्यानंतर पोलीस स्टेशनची परवानगी,देणगी जमा करणे,कार्यक्रम आखणे आदी कामे नियोजनबद्ध पद्धतीने केली.
—————————————————————————
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्याबाबत समाजातील महिलांनी जो पुढाकार घेतला तो,माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमानास्पद वाटणारा आहे. पाचेगाव बु॥ येथील आंबेडकरी समाजाने महाराष्ट्राला आजवर अनेक नेतृत्व करणारे हिरे दिले. त्यामध्ये राज्यातील जेष्ठ विचारवंत प्रा.गौतमीपुत्र कांबळे व मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन सिद्धार्थ कांबळे, दै. लोकसत्तेचे सहसंपादक मधु कांबळे यांनी आपापल्या क्षेत्रात नावे कमाविली आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळ हे संपूर्ण महिलांचे करणारे राज्यातील पाचेगाव बु॥ हे कदाचित एकमेव असेल असे वाटते. हाही आदर्श यापुढे राज्यभर व्हावा,ही अपेक्षा.
– माजी सरपंच बाबासाहेब कांबळे
—————————————————————————
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने