सांगोला येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत व एसटी आगारातर्फे प्रवासी दिन साजरा

 

सांगोला :

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने प्रवासी वर्गासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण करुन दिल्या असून प्रवासी वर्गाने आजच्या काळात सुरक्षित व सुखकारक प्रवास म्हणून खाजगी वाहतुकीपेक्षा विना अपघात सुरक्षित प्रवास देणारी एसटी सेवा ही आपली समजून यापुढील काळात एसटी प्रवासालाच प्राधान्य द्यावे,असे आवाहन ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक नागेश जोशी यांनी प्रवासी जनतेला केले.

‘रथ सप्तमी’ निमित्त सांगोला तालुका ग्राहक पंचायत व सांगोला एसटी आगार यांचे संयुक्त विद्यमाने सांगोला एस.टी.स्टँडवर प्रवासी दिन आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगार प्रमुख देशमुख साहेब हे होते. यावेळी, उपस्थितांचे स्वागत ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत लिगाडे यांनी करून “गरजा महाराष्ट्र माझा” हे स्फूर्ती गीत सादर करून कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी एसटीने प्रवास करणाऱ्या महिला व पुरुष प्रवाशांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

प्रवासी जनतेला या पुढील काळात चांगली सेवा देऊन असणाऱ्या समस्या प्रामुख्याने सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु व मंगळवेढा मार्गे सांगोला ते सोलापूर ही बस सेवा पूर्वीप्रमाणे लवकरच सुरु करण्याचा प्रयत्न करु,असे आश्वासन आपल्या भाषणात आगार प्रमुख देशमुख साहेब यांनी दिले.यासमयी,सांगोला एसटी आगारातर्फे ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  आभार व समारोप ग्राहक पंचायतीचे संघटक डॉ.मानस कमलापूरकर यांनी केला. या समारंभास ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष उत्तमराव चौगुले,प्रसिद्धीप्रमुख हमीद बागवान, एसटी आगार पर्यवेक्षक शिंत्रे मॅडम यांचेसह एसटी आगाराचे चालक,वाहक,कर्मचारी व ग्राहक पंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी,प्रवासी जनतेला प्रवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन तिळगुळ व अल्पोपहार देण्यात आला.