महत्वाच्या बातम्या

पीएम स्वनिधी अंतर्गत सांगोला नगरपरिषदेकडून पथविक्रेत्यांना परिचय बोर्डाचे वाटप

सांगोला :

ज्या पथ विक्रेत्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे,अशा पथ विक्रेत्यांना देण्यासाठी केंद्र शासनाकडून सांगोला नगरपरिषदेकडे पीएम स्वनिधी परिचय बोर्ड प्राप्त झाले असून सदर पीएम स्वनिधी परिचय बोर्डाचे वाटप सांगोला नगरपरिषदेचे नुतन मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड-१९ च्या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केल्याने तेंव्हापासून पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांना उभारी मिळण्याकरिता केंद्र शासन पुरस्कृत “पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी” (pmsvanidhi) या योजनेची सुरुवात करण्यात आली. यामध्ये शहरातील फळे,भाजी,तयार खाद्य पदार्थ,चहा,भजीपाव,अंडी,कापड, चप्पल,उत्पादित वस्तू,रस्त्यावरील केशकर्तन,चर्मकार, पानपट्टीधारक इत्यादींना पुन्हा आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भाग भांडवलाचा पतपुरवठा केला जात आहे. सांगोला नगरपरिषदेने “पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने घंटागाडी,बॅनर, वृत्तपत्र, बचत गट इत्यादीच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धीकरण केले असून या अनुषंगाने नगरपरिषदेकडून सांगोला शहरातील २२६ पथ विक्रेत्यांना प्रथम टप्प्याचे १० हजार रुपये तर, ९८ पथ विक्रेत्यांना द्वितीय टप्प्याचे २० हजार रुपये कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात २१ पथ विक्रेत्यांना परिचय बोर्डाचे वाटप करण्यात आले.या परिचय बोर्डावर पथ विक्रेते यांचे नांव,फोटो, व्यवसाय व वेंडिंग प्रमाणपत्र क्रमांक नमूद आहे.याप्रसंगी,ज्या पथ विक्रेते यांनी वेळेत कर्जाची परत फेड केली आहे, अशांनी पुढील टप्प्यातील कर्जाचा लाभ घ्यावा तसेच वेळेत कर्जाची परत फेड करावी,असे आवाहन मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांनी पथ विक्रेत्यांना केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे यांनी केले.तर, आभार समुदाय संघटक बिराप्पा हाके यांनी मानले.
—————————————————————————
पथविक्रेत्यांनी कर्जासाठी अभियान कक्षाशी संपर्क साधावा :

“ज्या पथविक्रेत्यांना पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) योजने अंतर्गत पहिले कर्ज रक्कम रु.१० हजार, दुसरे कर्ज रक्कम रु.२० हजार व तिसरे कर्ज रक्कम रु.५० हजार या टप्प्यातील कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे,अशा पथविक्रेत्यांनी नगरपरिषदेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) कक्षाशी संपर्क साधावा. – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button