महत्वाच्या बातम्या

प्रलंबित व अर्धवट कामांना गती देऊन सांगोला तालुक्याचे हक्काचे मंजूर पाणी तात्काळ मिळावे

 

सांगोला :

दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील निरा उजवा कालव्याची सर्व प्रलंबित आणि अर्धवट कामे तात्काळ गतीशील करुन तालुक्यातील शेतीला मंजूर असणारे सर्व हक्काचे पाणी टेल टू हेड या न्यायाने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली.

शुक्रवारी पुणे येथील सिंचन भवन येथे झालेल्या नीरा उजवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, आम.रणजितसिंह मोहिते-पाटील, आम.समाधान आवताडे आम.राम सातपुते आदींसह कालवा सल्लागार समितीचे सदस्य व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतीला निरा उजवा कालव्यातून व सांगोला शाखा कालव्यातून पाणी मिळते.राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे सांगोला शाखा कालवा क्रमांक ४ व ५ तसेच निरा उजवा कालव्याची सांगोला तालुक्याच्या हद्दीत सुरू असलेली कामे संथ गतीने सुरु आहेत. नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण तसेच सांगोला शाखा कालवा क्रमांक ४ व ५ चे बंदिस्त पाईपलाईनचे काम गतिशील करुन आगामी रब्बी हंगामात निरा उजवा कालव्यातून सांगोला तालुक्याला मंजूर असणारे हक्काचे पाणी शासकीय नियमाप्रमाणे टेल टू हेड या प्रमाणे देण्यात यावे,अशी आग्रही मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली.

याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करुन उपस्थित मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील तसेच विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि सर्वच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिपकआबांच्या मागणीबाबत अनुकूलता दर्शविली. रब्बी हंगामात नीरा उजवा कालव्याचे पाणी सांगोला तालुक्यातील शेतीला मिळाल्यास ज्वारी, मका,हरभरा आणि गहू या शेतीपिकांसह डाळिंब, द्राक्ष, सीताफळ व अन्य फळबागांना त्याचा फायदा होणार आहे.
————————————————————————
    : अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करावीत :

दुष्काळी सांगोला तालुक्याने शेतीच्या,पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष केला आहे. शासनाने तालुक्यातील सिंचन योजनांवर कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. परंतु कांही कारणास्तव ही कामे अर्धवट राहिली आहेत किंवा काही संथ गतीने सुरु आहेत. अशी अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करुन सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाबाबत सरकारने विशेष लक्ष द्यावे.
                                   – दिपकआबा साळुंखे-पाटील
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button