सूर्योदय समूहाची विश्वासार्हताच मल्टीस्टेटला शिखरावर घेऊन जाईल – प्रा.गणेश शिंदे
मंगळवेढा :
सांगोला व मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्हा आणि परिसरामध्ये सूर्योदय उद्योग समूहाने आजवर विविध उद्योग व्यवसायामध्ये निर्माण केलेली स्वतंत्र प्रतिमा आणि सूर्योदय अर्बनसह वित्तीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून जपलेली ग्राहकांची विश्वासार्हताच एलकेपी मल्टीस्टेटला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल, असे गौरवोदगार महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते व प्रवचनकार प्रा.गणेश शिंदे यांनी काढले.
एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या आंधळगाव (ता.मंगळवेढा) येथील शाखेचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणामध्ये नुकताच संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंधळगावच्या सरपंच श्रीमती शांताबाई भाकरे होत्या.यावेळी बोलताना प्रा.शिंदे पुढे म्हणाले की,कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षण,आर्थिक भांडवल, मनुष्यबळ व अनुकूल परिस्थिती यापैकी कांहीही नसलं तरी चालेल मात्र,मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि हिम्मत असेल तर युवकांना कांहीही अशक्य नाही.शिक्षण अत्यंत कमी असूनही अपार कष्टाची तयारी असणारा माणूस, या ग्रुपचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांचा विविध क्षेत्रातील आजवरचा प्रवास अचंबित करणारा आहे. अनिलभाऊ आणि त्यांचे सवंगडी सहसंस्थापक सर्वश्री जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ.बंडोपंत लवटे व सुभाष दिघे गुरुजी यांनी आर्थिक संस्थांबरोबरच शिक्षण,कृषी,ज्वेलर्स,मोटर्स,कापड आणि दूध अशा विविध क्षेत्रांमध्ये घेतलेली उत्तुंग भरारी आजच्या युवकांना अनमोल दिशा देणारी आहे. लाखो रुपयांची उलाढाल असताना, कसल्याही प्रकारचे मतभेद न होता, तब्बल बारा वर्षाहून अधिक काळापासून वेगवेगळ्या कुटुंबातील हे चार मित्र एकत्रितपणे राहुन विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेतात,ही बाबच मुळात कौतुक करण्याच्या पलीकडची आहे, असे सांगत व मानवी जीवन आनंदी होण्यासाठी अनेक प्रकारचे मार्मिक दाखले देत प्रा.गणेश शिंदे यांनी उपस्थितांना सुमारे तासाहून अधिक काळ मंत्रमुग्ध केले.
यावेळी मंचावर शिवरत्न पतसंस्थेचे चेअरमन अशोक लेंडवे सर,कै.दत्ताजीराव भाकरे पतसंस्थेचे चेअरमन सुरेश भाकरे, धानेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन भालचंद्र तटाळे, लक्ष्मीदेवी पसंस्थेचे चेअरमन मल्लिकार्जुन पाटील, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन डॉ.संतोष लेंडवे तसेच एलकेपी मल्टीस्टेटचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी सहकार व वित्तीय क्षेत्रातील सुमारे अठरा वर्षाचा अनुभव आणि उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील सुमारे बारा वर्षाच्या अनुभवाबद्दल माहिती सांगत एलके पी मल्टीस्टेटची पुढील दिशा स्पष्ट केली. या उद्योग समूहातील विशेषतः दूध विभागामध्ये डॉ.बंडोपंत लवटे यांचे कार्य वाखाणण्यासारखे असून सुमारे पाच चीलिंग प्लांटच्या माध्यमातून दररोज एक लाख लिटरचा टप्पा पार करत असलेबद्दल समाधान व्यक्त केले. आर्थिक क्षेत्रात सुमारे तीस हजार समाधानी ग्राहकांच्या साथीने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये या मल्टीस्टेटच्या शाखांची उभारणी होत असताना आम्ही अत्यंत जबाबदारीने पावले टाकत आमच्या प्राणांपलीकडे ग्राहकांच्या हिताची जपणूक करु, असा ठाम विश्वासदेखील अनिलभाऊ इंगवले यांनी प्रस्ताविकामधून व्यक्त केला.
यावेळी मंचावरील मान्यवरांच्या वतीने अशोक लेंडवे सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. क्रेडिट सोसायटी आणि सहकार चळवळ यांचा संपूर्ण भारत देशातील इतिहास सांगत एलकेपी मल्टीस्टेटची शाखा आंधळगाव परिसरामध्ये उपलब्ध केल्याबद्दल संचालकांचे कौतुक केले. मल्टीस्टेट लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमा दिवशीच या शाखेने तब्बल एक कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा ओलांडल्याबद्दल संस्थेचे कर्तव्यदक्ष शाखाधिकारी वैभव लेंडवे तसेच दत्तात्रय कोरे,बिराप्पा कटारे, विजय लेंडवे व आकांक्षा कोरे या टीमचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कारदेखील यावेळी करण्यात आला. शेवटी आभार मानताना संचालक जगन्नाथ भगत यांनी कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी भाषणात व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता केली जाणार असल्याचे सांगत सर्व उपस्थित मान्यवरांसह ठेवीदारांचेही विशेष आभार मानले. प्रा.भारत मुढे यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये सूत्रसंचालन करत कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. संस्थेचे सुसज्ज व अद्यावत फर्निचर, आकर्षक बैठक व्यवस्था,फटाके व हलग्यांचा कडकडाट, ड्रोन कॅमेराचे चित्रण आणि उपस्थित मान्यवरांसाठी कोल्हापुरी फेट्यांचा साज यामुळे हा लोकार्पण सोहळा संस्मरणीय झाला असल्याच्या भावना परिसरा मधून व्यक्त केल्या जात आहेत.
—————————————————————————