महिला दिनानिमित्त सांगोला नगर परिषदेमार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रम

 

सांगोला :

            ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२५’ व ‘माझी वसुंधरा-५.०’ अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषदे मार्फत विविध स्पर्धा,कार्यशाळा व प्रशिक्षण तसेच “होममिनिस्टर-खेळ पैठणीचा” यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.

जागतिक महिला दिनानिमीत्त सांगोला नगरपरिषदेच्या वतीने दि.६ मार्च रोजी स.११ वाजता महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता ‘पाककला स्पर्धा’ तसेच दुपारी २ वा. ‘रांगोळी स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे.वरील दोन्ही स्पर्धेतील प्रत्येकी पहिल्या ३ क्रमांकांना रक्कम रुपये ५ हजार,३ हजार,२ हजार व उत्तेजनार्थ बक्षीसेही दिली जाणार आहेत.

            दि.७ मार्च रोजी सकाळी ११ वा. महिलांसाठी ‘केमिकल फ्री फ्रुट पल्प प्रिझर्वेशन व फ्लोरल ड्रिंक’      (फुलांचे सरबत) या विषयावर प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.तर,दि.८ मार्च रोजी “होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा”,लकी ड्रॉ व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

वरील सर्व कार्यक्रम हे सांगोला शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह (टाऊन हॉल) येथे होणार आहेत.तरी,सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपला सहभाग नोंदवावा,असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.


——————————————————————————