सांगोला :
सांगोला शहरातील जुने व नामांकित मंडळ असलेल्या भारत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाचे यंदा हीरक महोत्सवी (६० वे) वर्ष असून त्यानिमीत्त मंडळाने
विवीध कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती या मंडळाच्या वतीने देण्यात आली.
हीरक महोत्सवी वर्षानिमीत्त यंदाच्या वर्षी १५ फुटी उंच,सुबक व नयनरम्य अशी देखणी सिंहासनावर बसलेली गणेशमूर्ती आणलेली आहे. सन १९६५ मध्ये स्थापना झालेल्या या सार्वजनिक मंडळाचे सांगोला मध्ये मोठे नांव असून मुंबईचा गणपती सांगोल्यात आणून सांगोल्यासारख्या ग्रामीण भागातील लोकांनाही नयनरम्य मूर्ती पाहता यावी याकरिता,या मंडळाने आजपर्यंत दरवर्षी अनेक मोठमोठ्या गणपतीच्या सुबक व नयनरम्य मुर्त्या आणल्या आहेत. मंडळाच्या वतीने नेहमीच आकर्षक सजावट,समाज प्रबोधनात्मक सजीव देखावे,थर्माकोलचे म्हैसूर पॅलेस करुन सांगोलकरांना मुंबईसारख्या शहरातील मोठ्या गणपतीचा देखावा सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
मंडळाच्या वतीने आजपर्यंत गेल्या ६० वर्षात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले असून मोफत सर्व रोग निदान शिबिर,मोफत नेत्ररोग शिबीर,महिला भजन स्पर्धा,होम मिनिस्टर,रांगोळी स्पर्धा,रंगभरण स्पर्धा, मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप तसेच मनोरंजनाच्या दृष्टीने मंडळाच्या वतीने पूर्वीच्या काळात छोट्या पडद्यावर अनेक चांगले चित्रपट दाखवण्यात आलेले होते. मंडळाला आजपर्यंत महाराष्ट्र शासन,सामाजिक संस्था,पोलीस स्टेशनचे पुरस्कार व अनेक सन्मान मिळालेले आहेत. अलीकडच्या काळात मराठी पाऊल पडते पुढे, महाराष्ट्राची लोकधारा,लावण्यखणी यासारखे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम देखील मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहेत.
जुन्या काळात भारत गल्ली गणेशमंडळाचा रेल्वेने येणारा गणपती म्हणून या मंडळाची ख्याती होती. पूर्वीच्या काळात या मंडळाचा गणपती रेल्वेने मुंबईहून कुर्डूवाडीपर्यंत आणला जायचा आणि कुर्डूवाडीतून पुन्हा बार्शी लाईट (नॅरो गेज) रेल्वेने हा गणपती सांगोल्याच्या रेल्वे स्टेशनवर यायचा.त्या काळातील अबालवृद्ध,लहान मुले तसेच सांगोला शहरातील नागरिक सांगोल्याच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन भारत गल्लीचा गणपती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे. परगावी बाहेर जाऊन मुंबईहून चांगल्या उंच व सुबक अशा गणपतीच्या मुर्त्या आणण्याची प्रथा सांगोल्यात पहिल्यांदा भारत गल्ली गणेशोत्सव मित्र मंडळाने सुरु केली असल्याने या मंडळाने आणलेली सुबक,देखणी व उंच मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. ६० वर्षा पासून मुंबईहून सुबक व नयनरम्य मुर्ती आणण्याची परंपरा मंडळाने अविरतपणे अगदी कोरोनाच्या काळात देखील कायम ठेवली आहे.
या मंडळाचे यंदा ६० वे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्त मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. बुधवार दि.११ सप्टेंबर २०२४ रोजी सायं.७ वाजता घरगुती गौरी सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सदरची स्पर्धा स्पर्धकाच्या घरी जाऊन परीक्षण करुन घेण्यात येणार आहे.गुरुवार दि.१२ सप्टेंबर रोजी स.१० वाजता इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या रंगभरण स्पर्धेमध्ये मंडळाच्या वतीने चित्र काढलेला कागद देण्यात येणार असून त्या चित्रावर रंग भरुन द्यायचे आहेत.तर,शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वरील सर्व स्पर्धांकरिता प्रथम क्रमांक २००१/-रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक १५०१/-रुपये व ट्रॉफी, तृतीय क्रमांक १००१/-रुपये व ट्रॉफी तर,उत्तेजनार्थ ५०१/- व ट्रॉफी देण्यात येणार आहे. सर्व बक्षिसांना स्व.मारुती शिवाजी सोनवणे (पत्रकार) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ट्रॉफी देण्यात येणार आहे.वरील स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना सहभागाकरिता प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.सर्व स्पर्धा या मंडळाच्या मंडपामध्येच होणार आहेत.वरील सर्व स्पर्धांसाठी नांव नोंदणीसाठी तृप्ती फॅशन (अण्णाभाऊ साठे पुतळ्याखाली,शहर पोलीस चौकी जवळ,सांगोला) या ठिकाणी नांवे नोंदवावीत.तसेच अधिक माहितीसाठी मो.नं. ७२४९२९१०४४ / ९०२८५९१४३१ / ९९७०८३११५५ यावर संपर्क साधावा,असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
तसेच रविवार दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोफत नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये पूर्णतः डोळ्याची तपासणी मोफत करुन मिळणार आहे व त्यावर उपचार,सल्ला देखील मोफत देण्यात येणार आहे.सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधे देखील देण्यात येणार आहेत.तर,मंगळवार दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.वरील सर्व स्पर्धा व कार्यक्रमाचा लाभ सांगोला शहरवासीयांनी घ्यावा,असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————————
More Stories
आपुलकी प्रतिष्ठानचा गुंफण सामाजिक पुरस्काराने गौरव
स्व.आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंती निमीत्त बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा
कर्करोग तपासणी व जनजागृतीसाठी सांगोल्यात रोटरी क्लबने काढली रॅली