चारा छावणीचे मंजूर अनुदान छावणी चालकांना तात्काळ अदा करावे – दीपकआबांची प्रधान सचिवांकडे मागणी

सांगोला :

                   सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील सुमारे २१४ चारा छावणी चालकांच्या ३६ कोटी रुपयांच्या अनुदानाबाबत राज्याच्या वित्त विभागाशी पत्रव्यवहार करुन राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने हे अनुदान छावणी चालकांना तात्काळ अदा करावे,अशी मागणी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली आहे.

सन २०१८-१९ मध्ये सांगोला व मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी भागातील पशुधन जतन करण्यासाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. सदरच्या चारा छावण्या बंद होऊन ४ ते ५ वर्षांचा कालावधी उलटला तरीही,चारा छावणी चालकांचे अनुदान शासनाने न दिल्याने चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते. याबाबत,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुन छावणी चालकांच्या रखडलेल्या अनुदानाची फाईल पुन्हा उघडून याबाबत चौकशी समिती नेमून समितीच्या अहवालानुसार सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील २१४ छावणी चालकांचे सुमारे ३६ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.

              छावणी चालकांसाठी मंजूर असणारे अनुदान राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने वित्त विभागाशी आवश्यक पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांना तात्काळ अदा करावे,या मागणीसाठी चारा छावणी चालकांच्या शिष्टमंडळासह दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच या खात्याच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन त्यांना दिले. यावेळी छावणी चालक संघटनेचे प्रवीण नवले, विनायक मिसाळ,कैलास माळी,अनिल पाटील आदी छावणी चालक उपस्थित होते.
                   ————————————————————

छावणी चालकांच्या खात्यावर अनुदान जमा होईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार :

सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांना प्रलंबित अनुदान मिळावे,म्हणून गेल्या ४ ते ५ वर्षांपासून छावणी चालक शिष्टमंडळासोबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.सध्या छावणी चालकांना प्रलंबित अनुदान मंजूर असले तरीही प्रत्यक्ष छावणी चालकांचे प्रलंबित अनुदान व शासनाकडे त्यांची असलेली डिपॉझिट छावणी चालकांच्या खात्यावर जमा होत नाही,तोपर्यंत आपला पाठपुरावा सुरुच राहणार.
                                   – दीपकआबा साळुंखे-पाटील
——————————————————————————