सामाजिक

मिरज-पंढरपूर रोडवर वृक्षारोपण करण्याबाबत वनमंत्र्यांनी दिले केंद्रीय मंत्र्यांना पत्र

मुंबई/प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उदनवाडी गावचे तत्कालीन मैलकुली स्व.नैमुद्दीन दादुभाई मुलाणी यांनी मिरज ते पंढरपूर या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले होते.परंतु,रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली मोठमोठी वडाची झाडे तोडण्यात आली असून तेथे नव्याने वृक्षारोपण करण्याची मागणी त्यांचे नातू व रुग्ण हक्क परिषद मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी राज्याचे वनमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली असता,त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नाम.नितीन गडकरी यांना पत्र लिहून वरील मागणीची दखल घेण्याबाबत सूचवले आहे.

शाहरुख मुलाणी यांचे पणजोबा स्व.नैमुद्दीन दादूभाई मुलाणी हे सार्व.बांधकाम विभागाकडे मैलकुली म्हणून कार्यरत असताना त्यांनी मिरज-पंढरपूर या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्यांची देखभाल व संगोपन केले होते.गेल्या ५-६ वर्षापूर्वी मिरज-पंढरपूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यानंतर रस्त्याचे रुंदीकरणावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेली वडाची झाडे तोडण्यात आली.पण,रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले नाही,ही अत्यंत खेदाची बाब आहे.

त्यामुळे,मुलाणी यांनी मिरज ते पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा वृक्षारोपण करण्यासंबंधी शासन व प्रशासनास दि.२३ नोव्हेंबर २०२१ रोजी पत्र लिहिले होते.परंतु,त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.म्हणून मुलाणी यांनी पुन्हा राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे सदरची कैफियत मांडली असता,त्यांनी यासंदर्भात, तात्काळ केंद्रीय रस्ते वाहतूक तथा एनएचएआय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून उक्त मागणीची दखल घेण्याविषयी विनंती केली असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषद मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी दिली आहे.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button